भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना हादरा देत राज्यसभेत पोहोचलेले काँग्रेसचे अहमद पटेल यांचे शिवसेनेने अभिनंदन केले आहे. ‘जो जीता वही सिकंदर’ असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पटेल यांना शुभेच्छा दिल्या.
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी मंगळवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत पहिल्या दोन जागांसाठी भाजपच्या वतीने अमित शहा, स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोघांचा विजय निश्चित होता. तर तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसचे अहमद पटेल विरुद्ध भाजपचे बलवंतसिंह राजपूत यांच्यात लढत होती. विशेष म्हणजे राजपूत हे राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपत सामील झाले होते. अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव असल्याने काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. तर अहमद पटेल यांचा पराभव करुन काँग्रेसला हादरा देण्याचे भाजपचे मनसुबे होते.
मंगळवारी रात्री उशीरापर्यंत या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. काँग्रेस आणि भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. शेवटी रात्री उशीरा मतमोजणी झाली आणि यात अहमद पटेल यांचा विजय झाला. पटेल यांच्या विजयाने भाजपला हादरा बसला. अहमद पटेल यांच्या विजयावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अमित शहा आणि स्मृती इराणी यांच्यासारखेच मी अहमद पटेल यांचेही अभिनंदन करतो. ‘जो जीता वही सिकंदर’ असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे अमित शहा यांना टोला लगावला.