गुजरात निवडणुकीत भाजपाने आपला इतिहासातील सर्वात मोठा विजय प्राप्त केला आहे. भाजपाने आपले सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भाजपाने १५७ जागांवर विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घेतली, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, “गुजरातच्या जनतेसमोर नतमस्तक आहे. जनतेचा आशीर्वाद अभूतपूर्व आहे. हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपाला एक टक्क्यांहून कमी मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. पण, हिमाचलच्या विकासासाठी आम्ही १०० टक्के कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देतो.”
हेही वाचा : गुजरातमधील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “कठोर परिश्रम करू आणि…”
“जनतेने भाजपाला मतदान केलं, कारण आमचा पक्ष प्रत्येक गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबाला सर्व सुविधा देऊ इच्छितात. देशाच्या हितासाठी सर्वात मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद भाजपात असल्याने लोकांनी आम्हाला मतदान केलं. भाजपाचे समर्थन वाढल्याने परिवार वाद आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रोश वाढत आहे,” असा टोलाही पंतप्रधानांनी काँग्रेसला लगावला आहे.
हेही वाचा : “केजरीवालांनी टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीविषयी लिहून दिलं होतं की…”, फडणवीसांचा ‘आप’वर हल्लाबोल
“गुजरातच्या जनतेने ‘रेकॉर्ड’चा ‘रेकॉर्ड’ मोडून भाजपाने नवा इतिहास रचला आहे. जात, पात, धर्म सोडून जनतेने भाजपाला मतदान केलं. तरुण तेव्हाच मतदान करतात, जेव्हा त्यांच्यात विश्वास असतो की सरकार काम करत आहे. आज तरुणांनी मोठ्या संख्येने भाजपाला मतदान केलं आहे, त्यामागचा संदेश स्पष्ट आहे,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.