‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकीची बनावट पत्रे पाठवणाऱ्या गुजरातमधील एका शास्त्रज्ञाला अटक करण्यात आली आहे. मुकेश शुक्ला असे त्याचे नाव असून, गुन्हे तपास शाखेच्या (डीसीबी) अहमदाबाद सायबर सेलने त्याला गुजरातच्या सुरेंद्रनगर येथून ताब्यात घेतले. गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने अरबी भाषेतील बनावट पत्रे तयार केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, शुक्ला यांनी पोलीस चौकशीदरम्यान वेगळाच दावा केला आहे. मी गेल्या २० वर्षांपासून मलेरिया आणि एड्सवरील औषधांवर संशोधन करत आहे. आयसिसला माझ्याकडून या औषधांबद्दलची गुप्त माहिती हवी आहे, असे शुक्ला याने सांगितले.

डीसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्ला यांचा संगणक स्कॅन केल्यानंतर त्यामध्ये आयसिसच्या नावे लिहिलेले इंग्रजी भाषेतील पत्र सापडले. तसेच शुक्ला यांनी संगणकातून ट्रान्सलेटरचे अॅप्लिकेशनही डिलिट केल्याचेही पुरावे मिळाले आहेत. गेल्या आठवड्यात शुक्ला याने स्वत:वर हल्ला झाल्याची खोटी कथा सुरूवातीला पोलिसांना सांगितली होती. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर केमिकल टाकून आपल्याला लुटण्याचा प्रयत्न केल्याचे शुक्लाचे म्हणणे होते. मात्र, पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केल्यानंतर त्याने झाल्याप्रकाराची कबुली दिली. मी गेल्या २८ वर्षांपासून मलेरिया आणि एड्सवरील उपचारांसाठीच्या औषधावर संशोधन करत आहे. मात्र, समाजात माझी कधीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मला नैराश्य आले होते. त्यामुळेच मी बनावट पत्रे लिहिली आणि माझ्यावरील हल्ल्याचा बनाव रचल्याचे शुक्ला याने सांगितले. सध्या शुक्ला याला अधिक चौकशीसाठी सुरेंद्रनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Story img Loader