Gujarat : गुजरातमधील सुरतमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरतमध्ये एका विवाह सोहळ्यात जेवणाची कमतरता भासल्यामुळे चक्क विवाह रद्द करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर मुलाच्या कुटुंबीयांनी जेवणाच्या कमतरतेमुळे लग्नास नकार दिल्यानंतर नवरीच्या कुटुंबीयांनी विवाह सोहळ्यात थेट पोलीस बोलावले. त्यानंतर चक्क पोलीस ठाण्यातच विवाह सोहळा पार पडला. या संपूर्ण घटनेची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. या घटनेचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नेमकं काय घडलं?
सुरतमध्ये एक विवाह सोहळा पार पडत होता. मात्र, या विवाह सोहळ्यात पाहुण्यांना जेवणाची कमतरता भासली. त्यामुळे वराच्या कुटुंबीयांना राग अनावर झाला आणि थेट लग्नाला नकार दिला. त्यामुळे वधूच्या कुटुंबीयांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. यानंतर वराच्या कुटुंबीयांना काही पाहुण्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काही ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. यानंतर वधूने थेट पोलिसांकडे तक्रार केली आणि काही वेळात पोलीस थेट विवाह सोहळ्यात पोहोचले. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेबाबत पोलीस उपायुक्त आलोक कुमार यांनी सांगितलं की, हे प्रकरण सुरतच्या वरछा भागातील आहे. रविवारी तेथील एका हॉलमध्ये अंजली कुमारी आणि राहुल प्रमोद महतो नावाचे जोडपे लग्न करत होते. लग्नाची संपूर्ण तयार झाली होती. पाहुणे मंडळी देखील आली होती. लग्नमंडपात वधू-वरांनी लग्नाचे जवळपास सर्व विधी पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतर वराचे कुटुंबाने अचानक चालू असलेल्या लग्नाच्या विधींना थांबवलं. याचं कारण वराकडील पाहुण्यांना जेवण न दिल्याचे त्यांनी सांगितलं. वराच्या कुटुंबाने नातेवाईक आणि पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या कमतरतेमुळे हा सोहळा अचानक थांबवला. बहुतेक विधी पूर्ण झाले होते. फक्त हार घालणं बाकी होतं. पण मध्येच दोन कुटुंबांमध्ये अन्नाच्या कमतरतेवरून वाद झाला, असं डीसीपी कुमार यांनी सांगितलं.
वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे मागितली मदत
वराच्या कुटुंबीयांच्या अशा वागण्यामुळे नाराज झालेल्या वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. त्या पोलिसांत गेल्यानंतर वराच्या नातेवाईकांनी समारंभास सहमती दर्शविली. मात्र, वधूच्या कुटुंबाने कार्यक्रमस्थळी परत आल्यास आणखी मतभेदाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यामुळे पोलीस ठाण्यातच लग्न लावण्यात आलं. दरम्यान, वधू आणि वराच्या भवितव्याचा विचार करून पोलिसांनी हस्तक्षेप करत लग्नासाठी मदत केली असल्याचं डीसीपी कुमार यांनी सांगितलं.