Child Marriage: गुजरातमध्ये गेल्या वर्षी १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली होती. पीडित मुलीने आपला बालविवाह केल्याच्या धक्क्यातून जीवन संपवले होते. मुलीच्या आत्महत्येमागील खरे कारण समोर येताच पोलिसांनी पीडित मुलीचे आई-वडील आणि सासरच्या लोकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

जानकीकुमारी चुनारा नावाच्या या मुलीचा १ जून २०२४ रोजी मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे समोर आले होते. दरम्यान तपास करताना, मातर पोलिसांना असे आढळले की, पीडित मुलीचे लग्न अल्पवयीन असताना झाले होते.

त्राणाजा येथील श्री नरनारायण देव हायस्कूलच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर पीडित मुलीची जन्मतारीख १७ मार्च २००७ अशी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हा ती अल्पवयीन (१६ वर्षांची) होती आणि मृत्यूच्या वेळी १७ वर्षे ११ महिने होती. दरम्यान पीडित मुलीने दहावीनंतर शाळा सोडली होती. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

पोलीस उपनिरीक्षक एनजे पांचाळ यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पीडितेचा विवाह १९ मार्च २०२३ रोजी माछीयेल गावात झाला होता. त्यावेळी नवरा मुलगा, आनंद चुनारा, हा देखील अल्पवयीन असल्याचे आढळून आले, त्याची जन्मतारीख २९ ऑक्टोबर २००७ अशी आहे. त्यामुळे लग्नाच्या वेळी तो १५ वर्षे ५ महिन्यांचा होता.

“जन्म नोंदी, शाळेचे दाखले, छायाचित्रे आणि निमंत्रण पत्रिकेच्या आधारे, हे सिद्ध झाले आहे की लग्नाच्या वेळी दोन्ही पीडित मुलगी आणि नवरा मुलगा अल्पवयीन होते. त्यामुळे, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार हा दंडनीय गुन्हा आहे”, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

खेडाच्या मातर पोलिसांनी नुकतेच पीडित मुलीचे आई-वडील तेजल चुनारा आणि अरविंद चुनारा व सासू-सासरे वसंत चुनारा आणि राधा चुनारा यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी, पीडितेच्या आत्महत्येनंतर मातर पोलिसांनी तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, हुंडा आणि किरकोळ घरगुती वादांमुळे पीडित मुलीचा सासरी छळ आणि मारहाण झाली होती. हा विवाह सोहळा करणाऱ्या पुजाऱ्याचा मुलगा अक्षय पुरोहित यांनी सांगितले की, त्यांच्या दिवंगत वडिलांनी हा विवाह सोहळा आयोजित केला होता. हा विवाह पारंपारिक हिंदू विधींनुसार झाला असून, त्याची कुठेही अधिकृत नोंदणी केलेली नाही. असेही टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्ताच म्हटले आहे.