भारत हा सर्वाधिक सोन्याची खरेदी करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मात्र, सामान्यपणे भारतात सोन्याची खरेदी दागिन्यांबरोबरच भविष्याची तरतूद म्हणूनही केली जाते. त्यामुळे अडचणीच्या काळासाठी खरेदी केलेलं किंवा राखून ठेवलेलं सोनं शक्यतो बाहेर न काढण्याच्या दिशेने सामान्य नागरिकांचा कल दिसून येतो. मात्र, एकीकडे हजारो किलो सोनं घराघरांत, कंपन्यांकडे, मंदिर ट्रस्टकडे पडून असताना दुसरीकडे भारताला परदेशातून सोनं आयात करण्याची वेळ येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेमध्ये गुजरातमधल्या मंदिरांनी मिळून जवळपास २०० किलो सोनं ठेवलं आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरात वेगवेगळ्या संस्था, कंपन्या, मंदिर ट्रस्ट आणि याचबरोबरीने घरोघरी मोठ्या प्रमाणावर सोनं पडून असताना त्याचा देशाच्या विकासासाठी अधिक उपयुक्त पद्धतीने वापर करता येऊ शकतो या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. यानुसार या योजनेत ठेवलं जाणारं सोनं इतर उत्पादक गोष्टींमध्ये सरकारकडून गुंतवलं जातं. त्याबदल्यात सोनं ठेवणाऱ्यांना व्याजाच्या स्वरूपात परतावाही दिला जातो. त्यामुळे दोन्ही बाजूंचा फायदा होतो.

गुजरातमधील मंदिरांनी जमा केलं २०० कोटी सोनं!

दरम्यान, नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गुजरातमधील मंदिरांनी मिळून या योजनेत जवळपास २०० किलो सोनं ठेवलं आहे. त्यातील तब्बल १६८ किलो सोनं एकट्या अंबाजी मंदिर ट्रस्टकडून आलं आहे. याव्यतिरिक्त नुकतंच मंदिराच्या सुशोभिकरणासाठी १४० किलो सोन्याचा वापर करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे. गुजरातच्या बनसकंठा जिल्ह्यात हे अंबाजी मंदिर आहे.

सोमनाथ मंदिराकडूनही ६ किलो सोनं

दरम्यान, दुसरीकडे गुजरातमधील सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराकडून या योजनेसाठी ६ किलो सोनं ठेवण्यात आलं आहे. सोमनाथ मंदिर ट्रस्टकडूनही मंदिर सुशोभिकरणासाठी नुकतंच १५० किलो सोनं वितळवून त्याचा वापर केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर ६ किलो सोनं गोल्ड मोनेटायझेशन स्कीमसाठी ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, सोन्याच्या स्वरुपात मंदिराकडे फारच कमी दान येत असल्यामुळे द्वारकेतील प्रसिद्ध श्री द्वारकाधीश मंदिराकडून या योजनेसाठी सोनं ठेवण्यात आलेलं नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat temples cumulatively deposited 200 kg gold in gms most by ambaji temple trust pmw
Show comments