पटेल समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर गुजरातमध्ये गुरुवारी शांततेचे पण तणावपूर्ण वातावरण आहे. नव्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राजधानी अहमदाबादसह अन्य संवेदनशील भागांमध्ये लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान आंदोलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या नऊवर गेली आहे.
अहमदाबादमधील पोलीस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार शहरात बुधवारी रात्रीपासून दगडफेकीच्या किरकोळ घटना वगळता शांतता आहे. सर्व ठिकाणी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. आंदोलकांच्या दगडफेकीमुळे जखमी झालेले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप राठोड यांचा गुरुवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या नऊ झाली आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांचे नेते हार्दिक पटेल यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दोषी पोलीस कर्मचाऱयांना निलंबित करण्याची आणि आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. आर्थिक मदत केली नाही, तर ग्रामीण भागातून भाजीपाला आणि दूध शहरात घेऊन न येण्याचे आवाहन लोकांना करण्यात येईल, असाही इशारा त्याने दिला.