गुजरातमधील राजकोट महानगरपालिकेने मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. २९ जुलैपासून श्रावणी सोमवार सुरु होत असल्याने या कालावधीमध्ये मांस, मटण, अंडी आणि माशांची विक्री करता येणार नाही असं राजकोट महानगरपालिकेने जारी केलेल्या पत्रात म्हटलंय.

महानगरपालिकेने श्रावणी सोमवारच्या दिवशी मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. १ ऑगस्ट, ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २८ ऑगस्ट या दिवशी मांसविक्री करता येणार नाही असं महापालिकेने म्हटलंय. ३० जुलैपासून श्रावण महिना सुरु होत आहे. उत्तर भारतामध्ये श्रावण हा पश्चिम भारतातील राज्यांपेक्षा १५ दिवस आधीच सुरु होतो.

महानगरपालिका क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करुन कोणी या कालावधीमध्ये मांसविक्री करताना दिसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं महापालिकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार राजकोटप्रमाणेच गुजरातमधील अहमदाबाद, सूरत आणि वडोदरासारख्या महानगरपालिकाही यासंदर्भातील निर्देश आगामी काही दिवसांमध्ये जारी करतील. गुजरातमध्ये मांसाहार करणाऱ्यांचं प्रमाण हे बऱ्याच राज्यांच्या तुलनेत कमी असल्याने अनेक सर्वेक्षणांमध्ये दिसून आलंय.