नवी दिल्ली : चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे यंदा ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट महामंडळाने (एफएफआय) मंगळवारी याबाबत घोषणा केली. सौराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एका मुलाचे चित्रपटांवरील प्रेम ‘छेल्लो शो’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
‘छेल्लो शो’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता. ‘‘ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे कोणता चित्रपट पाठवायाचा याबाबत दीर्घ चर्चा झाली. एस. एस. राजमौलीचा ‘आरआरआर’, रणबीर कपूर अभिनित ‘ब्रह्मास्त्र’, विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ आणि आर. माधवन यांचे दिग्दर्शन असलेला ‘रॉकेटरी’ या चित्रपटांवर चर्चा झाल्यानंतर ‘चेल्लो शो’ या चित्रपटाची एकमताने निवड करण्यात आली,’’ असे एफएफआयचे अध्यक्ष टी. पी. अगरवाल यांनी सांगितले.
ऑस्कर पुरस्कार सोहळा १२ मार्च २०२३ रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे.