गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की यावेळी काँग्रेस पक्षाबद्दलही सामान्य मतदार विचार करतो आहे. सर्वसामान्य लोकांशी बोलताना तसे स्पष्टपणे जाणवते. गेल्या २२ वर्षांपासून सलग भाजप इथे सत्तेत आहे. पण या कालावधीत झालेल्या चार निवडणुकांमध्ये भाजपला हरवून सत्ता काबीज करण्याची किमया काँग्रेस साधू शकला नव्हता. पण यावेळी काँग्रेस पक्ष इथं चर्चेत आहे. सुरत, भावनगर, राजकोट या शहरांमध्ये फिरल्यानंतर तशी परिस्थिती असल्याचे जाणवते. अर्थात यामागे काँग्रेसने विरोधक म्हणून इथे पार पाडलेली जबाबदारी यापेक्षा आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री झाल्यावर उदभवलेली परिस्थिती हाताळण्यात त्या सक्षम न ठरल्याचा मुद्दा जास्त मोठा आहे. आणि याचाच लाभ घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे यदाकदाचित काँग्रेसला इथे यश मिळालंच तर त्याचं श्रेय भाजपच्याच गेल्या तीन वर्षांतील ‘कामगिरी’ला द्यावं लागेल.

भावनगरमधले काँग्रेसचे पदाधिकारी लालबा गोहिल यांच्याशी बोलत होतो. ते फार उत्साहाने यंदा काँग्रेससाठी परिस्थिती कशी अनुकूल आहे, याची माहिती देत होते. अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी यांचा उदो उदो करीत होते. गुजरात विधानसभेत ४८ जागा सौराष्ट्रमधील आहेत. या भागात पटेल समाजाचे वर्चस्व आहे. हार्दिक पटेल यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा काँग्रेसला कसा फायदा होईल, याबद्दलही ते सांगत होते. त्यांना सहज प्रश्न विचारला की राज्यातील कोणकोणते प्रश्न आहेत जे भाजपला गेल्या दोन दशकांमध्ये सोडवता आले नाहीत. त्यांनी आपल्या उत्तराची सुरुवातच जीएसटीपासून केली. जीएसटीमुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांना कसा झटका बसलाय, प्रत्येकाचे नुकसान झालंय, व्यवसायाच्या उलाढालींवर परिणाम झालाय, असं सगळं सांगत होते. जीएसटी हा मुद्दा गुजरातसाठी निर्विवादपणे महत्त्वाचा आहे. पण त्यापेक्षा वेगळे आणि या राज्यापुरते असे काही प्रश्न आहेत का, असे पुन्हा विचारल्यावर त्यांना नेमकं उत्तर देता आलं नाही. ते परत परत नोटाबंदी, जीएसटी या भोवतीच फिरत राहिले. हाच अनुभव सुरतमध्येही आला. सुरतमधील काँग्रेसचे अध्यक्ष हसमुखभाई देसाई हे सुद्धा केवळ जीएसटी आणि नोटाबंदी यावर बोलू शकले. त्यांनाही गुजरात राज्याचे म्हणून काही प्रश्न आहेत का, त्यावर राज्यातील भाजप सरकार काही उपाय शोधू शकला नाही का, यावर काहीच सांगता आलं नाही.

राजकोटमध्ये फिरताना एका इमारतीवर काँग्रेसच्या प्रचाराचा एक भलामोठा फ्लेक्स दिसतो. या फ्लेक्सवर गुजरातीमध्ये एक वाक्य लिहिलंय. ज्याचा अर्थ मुख्यमंत्री राजकोटचे असूनसुद्धा या भागाचा विकास अहमदाबादसारखा झाला नाही, असा होता. आता या वाक्यातील एक मेख हे कॅम्पेन करणाऱ्यांच्या लक्षात आलेली नाही. राजकोटचा विकास झाला नाही, असे सांगताना अहमदाबादचा विकास झालाय, हे काँग्रेस मान्य करते का? असे असेल तर अहमदाबादमध्ये कोणता मुद्दा घेऊन काँग्रेस लढणार? हे मुद्दे उपस्थित होतात. हे बघितल्यावर काँग्रेसच्या प्रचारात एकसुत्रीपणा नसल्याचे जाणवते.

एक गोष्ट अगदी ठळकपणे जाणवते की गुजरातमध्ये फिरताना निवडणुकीत उतरलेला कोणीही राज्याचे प्रश्न उपस्थित करताना दिसत नाही. विरोधक जीएसटी, नोटाबंदी, पाटीदार आंदोलनभोवती केंद्रित मुद्दे मांडतात. तर सत्ताधारी भाजपचे नेते या मुद्द्यांना उत्तर देत फिरताहेत. केवळ जीएसटी, नोटाबंदी, पाटीदार आंदोलन या दोन मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरते आहे. आणि हेच मुद्दे मतदार मतदानाला जाईपर्यंत इथल्या हवेत फिरत राहणार. फक्त त्याचा रोख कोणत्या दिशेने असेल, यावर केवळ गुजरात नव्हे तर राष्ट्रीय राजकारणाचे भवितव्य अवलंबून आहे.

– विश्वनाथ गरुड
wishwanath.garud@loksatta.com

Story img Loader