मोदी समर्थक आणि मोदी विरोधक म्हणजेच भक्त आणि द्वेष्टे या दोन गटांत गेल्या तीन वर्षांमध्ये भारतीय समाजातील काही लोकांची विभागणी झाल्याचे अगदी सहज दिसते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्ता संपादन केल्यावर या विभागणीला हळूहळू धार येत गेली आणि गेल्या वर्षभरात तर हे दोन्ही गट प्रभावीपणे आपापले मुद्दे इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करताहेत. यातूनच मग कधी कधी विरोधक समर्थकांवर तुटून पडतात. तर कधी समर्थक विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जायला कमी करत नाही. सोशल मीडियावर तर या दोन्ही गटांतील वाद नित्याचाच. यातलं एक भयानक वास्तव असं की एकतर तुम्ही मोदी विरोधक असू शकता किंवा मोदी समर्थक. तुम्ही तटस्थ असूच शकत नाही, असं या दोन्ही गटांनी परस्पर ठरवून टाकलंय. म्हणजे तुम्ही मोदींचे समर्थन करणारी चार वाक्य लिहिली की द्वेष्टे तुमचा कडवा विरोध करतात तर मोदींच्या निर्णयाचा विरोध केला की समर्थक तुमच्या वॉलवर तुटून पडतात. अगदी देश सोडण्याचा सल्ला वगैरेही देतात. भ्रष्टाचार विरोधी आमच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा देत नाही, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचे समर्थक आहात, असे अरविंद केजरीवाल यांच्या गटाने अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वाखाली २०११ मध्ये दिल्लीत केलेल्या आंदोलनात म्हटले होते. सध्या सुरू असलेला प्रकार हा त्याचेच दीर्घ रूप म्हणायला हवे.
गुजरातमध्ये फिरताना मोदींचे समर्थक आणि विरोधक दोन्हीही दिसतात. पण एक गोष्ट नक्की की इथे समर्थकांचे प्रमाण विरोधकांपेक्षा जरा जास्तच. त्यातही विरोधकांमध्येही समर्थकच दडलेले आहेत. फक्त ते हळूहळू तुमच्या समोर येतात. आता याच कारण अगदी स्पष्ट आहे की गुजरात हे मोदींचे गृह राज्य. त्यात २००१ पासून २०१४ पर्यंत सलग १३ वर्षे मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते. या काळात विधानसभेच्या सलग तीन निवडणुका त्यांनी जवळपास एकहाती जिंकल्या. जसे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपपुढे आव्हान तरी उभे केले आहे. तशी स्थिती गेल्या दोन निवडणुकीत तरी गुजरातमध्ये दिसली नाही. गेल्या निवडणुकीतही मी गुजरातमध्ये फिरलो होतो. त्यावेळी तर मोदींना पंतप्रधान करायचंय, या एकाच विचाराने मोठ्या प्रमाणातील गुजराती समाज भारलेला होता. त्यामुळे विरोधाची धार अगदीच बोथट होती. पण आता स्थिती तशी राहिलेली नाही. हक्काच्या जागा जिंकण्यासाठीही भाजपने सर्व लक्ष त्या ठिकाणी केंद्रित केलं आहे. किंचितसाही प्रयत्न कमी पडायला नको, याची पुरेपूर दक्षता पक्षाच्या नेत्यांनी घेतल्याचे दिसते.
सुरत, भरूच, भावनगर, राजकोट आणि अहमदाबाद या सगळ्याच ठिकाणी फिरताना एकच व्यक्ती चर्चेच्या केंद्रस्थानी असते.. ती म्हणजे खुद्द नरेंद्र मोदी. प्रत्येक चर्चेची सुरुवात मोदींच्या नावानेच व्हायची आणि शेवटही मोदींवरच व्हायचा. नोटाबंदी, जीएसटी या निर्णयांमुळे लोकांना त्रास झाला हे सगळेच सांगतात. पण हे निर्णय घेण्याची हिम्मत फक्त मोदीच दाखवू शकतात, हे सुद्धा तेच सांगतात. मोदींच्या जागी दुसरा कोणताही राजकारणी असता, तर त्याने हे निर्णय घेतलेच नसते, असेही इथले लोक सांगतात. महेंद्र हा अहमदाबादमधला रिक्षाचालक. पालडीला रिक्षातून जाताना सहज निवडणुकीचा विषय निघतो आणि संपूर्ण प्रवासात महेंद्र मोकळेपणाने मनातले सगळे बोलून जातो. यावेळची निवडणूक अगदीच एकतर्फी नक्कीच नाही. काँग्रेसने वातावरण चांगलं तयार केलंय. पण भाजपचं निवडणूक जिंकणार, याची महेंद्रला खात्री आहे. आणि त्याच्या या खात्रीमागे नरेंद्र मोदीच आहेत. गुजरातची जनता मोदींकडे बघून भाजपला मतदान करणार, याचा त्याला विश्वास आहे. जे मत महेंद्रचं तेच प्रदीपचं. प्रदीप मराठी असला तरी गेल्या २० वर्षांपासून तो व्यवसायाच्या निमित्तानं राजकोटमध्ये स्थायिक झाला आहे. दहेज ते घोघा या रो रो फेरीमुळे आमचं काम किती सोप्प झालंय, याचे वर्णन तो याच प्रवासात करतो. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र या दोन्ही टोकांचा प्रवास अवघ्या एक तासात पार करणे या फेरीमुळे शक्य झालं आहे. याचा या दोन्ही भागांतील व्यावसायिकांना फायदाच होणार आहे. निवडणुकीबद्दल बोलताना प्रदीप एकदम मार्मिक वाक्य बोलून जातो. कोणाला किती हवा करायची ती करू द्या. निवडून शेवटी मोदीच येणारेत. निवडणूक कशी जिंकायची हे त्यांना चांगल कळलंय. त्यामुळे उगाच चर्चा करून काहीच उपयोग नाही.
प्रकाश मेवाडा हा अहमदाबादच्या रतनपोळ या कापड बाजारातील एक व्यापारी. आम्ही महाराष्ट्रातून आलोय, हे कळल्यावर तोच निवडणुकीचा विषय काढतो. गुजरातमध्ये काय स्थिती आहे, असं आम्हालाच विचारतो. काही सांगता येणार नाही, असे उत्तर दिल्यावर तो बोलायला लागतो. त्याच्याही बोलण्याचा रोख मोदींच्याच दिशेने. “साहेब, मोदींना कितीही विरोध करा. पण त्यांनी केलेले काम तुम्ही विसरू शकत नाही. आज गुजरातमधील रस्ते इतर राज्यांपेक्षा नक्कीच चांगले आहेत. विजेचा प्रश्न नाहीसाच झालाय. पाण्याचा प्रश्न्ही सुटल्यात जमा आहे. त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे संचारबंदी हा गुजरातला लागलेला एक डागच होता. सततच्या संचारबंदीमुळे आम्हा व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान व्हायचे. जातीय दंग्यांमुळे सतत भीतीचे वातावरण असायचे. पण मोदी सत्तेवर आल्यानंतर परिस्थिती एकदम बदलली. संचारबंदी संपुष्टात आली. आम्हाला मोकळेपणाने आमचा व्यवसाय करता येऊ लागला. आमच्यासाठी हा खूप मोठा मुद्दा आहे. त्यामुळे नोटाबंदी, जीएसटीमुळे आम्हाला त्रास झाला असला, तरी संचारबंदी संपुष्टात आणण्याचे मोदींचे काम आमच्यासाठी निश्चितच वरचे आहे.”, प्रकाश सांगतो.
यंदाची गुजरात निवडणूक भाजपसाठी निश्चितच आव्हानात्मक असली, तरी पुन्हा एकदा मोदीच पक्षाला तारून नेऊ शकतात, असे चित्र सध्या तरी दिसते आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्षाला यश किंवा अपयश काहीही आले तरी त्याची अंतिम जबाबदारी मोदींवरच असणार, हे निश्चित.
– विश्वनाथ गरुड
wishwanath.garud@loksatta.com