गुजरात भाजपाचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांनी गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात भगवान श्रीकृष्णांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावर वाद झाल्यानंतर सी. आर. पाटील यांनी माफी मागितली आहे. गुजरात सरकारने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पाटील यांनी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची बहिण सुभद्रा यांना पती-पत्नी म्हटलं होतं. यानंतर लोकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला होता.

या वादानंतर सी. आर. पाटील यांनी शनिवारी (१६ एप्रिल) व्हिडीओ जारी करत माफी मागितली. यात ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात चुकून नाव घेताना माझ्याकडून चूक झाली. मी ही चूक कार्यक्रमातच दुरुस्त केली होती. मात्र, काही स्थानिक लोकांनी माझ्या माफीची मागणी केली. त्याचंही मी सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला.”

“माझ्याकडून चूक झाली आहे, मी ती स्विकारतो”

“माझ्याकडून चूक झाली आहे. मी ती स्विकारतो. मी माझ्या वक्तव्यात भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी कोणतीही जात किंवा धर्माविषयी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. माझ्याकडून केवळ नाव घेताना चूक झाली होती. ती चूक मी पूर्णपणे स्वीकार करतो. माझ्या या वक्तव्यामुळे जर समाजात कोणाच्याही भावना दुखवल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो.”

विरोधकांकडून गुजरात भाजपा अध्यक्षांवर टीका

गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी सोशल मीडियावर सी. आर. पाटील यांची क्लिप शेअर करत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “ज्यांना भगवान श्रीकृष्णा आणि सुभद्राजी यांचं नातं काय होतं हेही माहिती नाही ते आज हिंदू धर्माचे ठेकेदार बनून फिरत आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि सुभद्राजी यांना पती-पत्नी असल्याचं सांगून भाऊ-बहिणीचं पवित्र नातं कलंकित करणाऱ्यांनी माफी मागावी.”

हेही वाचा : गुजरातमध्ये RSS च्या प्रदर्शनात मोहम्मद अली जिनांना मानाचं स्थान

भगवान श्रीकृष्णा आणि देवी रुक्मिणी यांचा विवाह माधवपूरमध्ये झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर दरवर्षी गुजरात सरकारकडून कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमात गुजरातसोबत देश-विदेशातून लोक येतात.

Story img Loader