देशभरातील CBSE च्या १२वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. असंख्य पालक आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने CBSE परीक्षांबाबत निर्णय घेतल्यानंतर लागलीच गुजरात बोर्डाने देखील राज्यातल्या १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्याच्या फक्त २४ तास आधी गुजरात बोर्डाने बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार १ जुलैपासून बारावी पुनर्परीक्षा आणि बाह्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर गुजरात बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

१ जुलैपासून सुरू होणार होत्या परीक्षा!

मंगळवारी १ जूनरोजी जेव्हा एकीकडे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये CBSE च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला, तिथे दुसरीकडे गुजरातमध्ये १२वी बोर्डाच्या परीक्षांचं सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यामध्ये १ जुलैपासून या परीक्षांना सुरुवात होणार होती. या परीक्षा पुढे १६ जुलैपर्यंत चालणार होत्या. तसेच, या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं.

 

मात्र, याचवेळी केंद्र सरकारने CBSE च्या परीक्षा रद्द केल्याचं जाहीर केल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत गुजरात सरकारनं राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी यासंदर्भात घोषणा केल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. त्यामुळे गुजरातमधल्या १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा मोठा दिलासा मानला जात आहे. देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरातच्या पाठोपाठ मध्य प्रदेश सरकारने देखील राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पंतप्रधान म्हणतात, “विद्यार्थ्यांवर परीक्षेची सक्ती नको”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. “विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षा याला सर्वाधिक प्राधान्य असेल. त्याविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला तणाव संपुष्टात यायला हवा. अशा प्रकारच्या तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती केली जाऊ नये”, असं यावेळी पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

हरयाणा सरकारनेही केल्या परीक्षा रद्द!

दरम्यान, केंद्र सरकार आणि गुजरात सरकारप्रमाणेच हरयाणा सरकारने देखील राज्य बोर्डाच्या अर्थात HBSE च्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या निर्णय़ानंतर हरयाणाचे शालेय शिक्षणमंत्री पाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “आम्ही देखील राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिक्षा Haryana Board of School Education तर्फे घेतल्या जाणार होत्या”, असं ते म्हणाले.

वाचा सविस्तर – केंद्रानं CBSE च्या परीक्षा रद्द करताच महाराष्ट्रातील बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान!

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाच्या १२वीच्या परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलल्या होत्या. त्यावर अद्याप निश्चित असा निर्णय घेण्यात आला नसून बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे. “यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल”, असं महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

Story img Loader