मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विशेषत: राजकीय वर्तुळात हा व्हिडीओ शेअर करत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करत भाजपावर आणि मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत टोलेबाजी केली आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्वीट करून खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे.
हा व्हिडीओ गुजरातमधला आहे. सध्या गुजरातमध्ये निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले असून स्थानिक राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला घेरायला सुरुवात केली आहे.
नेमका काय आहे हा व्हिडीओ?
या व्हिडीओमध्ये एखाद्या व्हीव्हीआयपी व्यक्तीच्या गाड्यांचा ताफा दिसत आहे. हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा ताफा असल्याचं सांगितलं जात आहे. मोदींच्या गाड्यांच्या ताफ्यातल्याच एका गाडीत बसण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करत आहे. ही व्यक्ती मध्येच पाठीमागे वळून कॅमेऱ्याकडे पाहात हातही हलवताना दिसत आहे. पण त्यांनी गाडीत बसण्याआधीच गाडी सुरू होते. मग आजूबाजूचे गार्ड त्यांना गाडीसोबतच चालत घेऊन जातात. ही व्यक्तीही गाडीच्या मागोमाग चालत बरीच पुढेपर्यंत जाते.
खुद्द मुख्यमंत्र्यांचाच गाडीत बसण्याचा खटाटोप!
गाडीत बसण्याचा खटाटोप करत पुढेपर्यंत चालत जाणारी ही व्यक्ती म्हणजे दुसरं-तिसरं कुणी नसून चक्क गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल असल्याचं समोर आलं आहे. भूपेंद्र पटेल या गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असताना गाडी अचानक सुरू होते आणि त्यांना पुढेपर्यंत चालतच गाडीसह जावं लागल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा ताफा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे.
काँग्रेसची उपहासात्मक टीका!
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागताच काँग्रेसच्या नेतेमंडळींनी त्यावरून तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी त्यावरून टोला लगावला आहे. “आहो ते मुख्यमंत्री आहेत, मंत्रालयातले शिपाई नाही की तुम्ही साहेबांच्या गाडीच्या मागे जेव्हा बघावं तेव्हा त्यांना पळवत राहता”, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसचे दुसरे नेते सुरेंद्र राजपूत यांनी ट्वीटमध्ये “पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं काय करून ठेवलंय”, असं म्हणत टोला लगावला आहे.