gujrat ribaba jadeja wins election: भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या पत्नीने गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. जामनगर (उत्तर) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या रिवाबा जडेजा यांचा ५० हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे. या मतदारसंघामधील एकूण मतदानापैकी ५७ टक्क्यापेक्षा अधिक मते रिवाबा यांना मिळाली आहेत. आम आदमी पक्षाचे करशनभाई करमूर हे मतांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी राहिले. त्यांना २३ टक्के मतं मिळाली तर काँग्रेसचे बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांना एकूण १५ टक्के मतं मिळाल्याने ते तिसऱ्या स्थानावर राहिले. पत्नीने मिळवलेल्या या विजयानंतर रवींद्र जडेजाने खास गुजराती भाषेत एक पोस्ट करत पत्नीला शुभेच्छा दिल्यात.
रविंद्र जडेजाने सोशल मीडियावरुन पत्नीच्या विजयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पत्नीच्या खांद्यावर हात ठेऊन उभं राहत पोज दिलेल्या फोटोमध्ये रविंद्र आणि रिवाबा यांच्या हातामध्ये गुजरात एमएलएल म्हणजेच गुजरातमधील आमदार अशा अर्थाची पाटी आहे. घरात काढलेला हा फोटो पोस्ट करताना जडेजाने खास गुजराती भाषेत कॅफ्शन दिली आहे. आपल्या पत्नीचं कौतुक करताना खरोखरच तू विजयासाठी पात्र आहेस, असं जडेजाने म्हटलं आहे.
तसेच जडेजाने आशापुरा देवीकडे एक मागणीही केली आहे. “हॅलो, आमदार! तू खरोखरच यासाठी पात्र आहेस. जामनगरच्या लोकांचा विजय झाला आहे. सर्वांचे मी आभार मानतो. मी आशापुरा देवीला प्रार्थना करतो की जामनगरमधील सर्व कामं नीट व्हावीत. देवी आम्हाला आशीर्वाद दे,” अशी कॅप्शन जडेजाने पत्नीबरोबरच्या फोटोला दिली आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते हरीसिंह सोलंकी यांच्या नात्यात असलेल्या रिवाबा यांनी २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. यंदा जामनगरमधून रिवाबा यांना भाजपाने उमेवारी दिली होती. मात्र, याच निवडणुकीत रविंद्र जडेजाची बहीण आणि काँग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या नैनाबा जडेजा काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत होत्या. काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्यासाठी नैनाबा यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही.
यासंदर्भात बोलताना नैनाबा यांनी आपली भूमिकाही मांडली होती. “जामनगरमधील निवडणूक ‘जडेजा विरुद्ध जडेजा’ नव्हती. कारण, वैचारिक मतदभेद असणारी जामनगरमध्ये अनेक कुटुंबे आहेत”, अशी प्रतिक्रिया नैनाबा यांनी दिली होती. “माझ्या भावावर माझे प्रेम कायम आहे. माझी वहिनी भाजपाची उमेदवारी असली तरी वहिनी म्हणून त्यांचा स्वभाव चांगला आहे. आमच्या कुटुंबात आम्हाला स्वातंत्र्य आहे. त्यांना जे काही करायचं ते करु शकतात,” असेही त्या म्हणाल्या होत्या.