आपण गाडी चालवत असताना नेहमीच ट्रॅफिकच्या नियमांची भीती आपल्या मनात असते. अपघातांचं प्रमाण कमी व्हावं आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जावं, यासाठीच मुळात हे ट्रॅफिकचे नियम बनवले असतात. ते पाळले जावेत, म्हणून उल्लंघन केल्यास योग्य तो दंड देखील वसूल केला जातो. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळित राहण्यास मदत होते. मात्र, दिवाळीचा उत्सव म्हणून नागरिकांना गुजरात सरकारने हा दंडच स्थगित केल्याचं दिवाळी गिफ्ट दिलं आहे! खुद्द गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनीच शुक्रवारी ही घोषणा केली आहे.
नेमकी काय आहे घोषणा?
दिवाळीच्या दिवसांमध्ये नागरिकांना दंडाच्या मनस्तापातून सुटका मिळावी, म्हणून गुजरात सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगिण्यात येत आहे. हर्ष सिंघवी यांनी शुक्रावीर एका कार्यक्रमात बोलताना यासंदर्भात घोषणा केली आहे. “२१ ऑक्टोबरपासून २७ ऑक्टोबरपर्यंत ट्रॅफिक नियम तोडलेत, तर त्यासाठी तुमच्याकडून कोणताही दंड वसूल केला जाणार नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या संमतीने आपण हा निर्णय घेतला आहे”, असं हर्ष सिंघवी यावेळी म्हणाले.
“पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ट्रॅफिकचे नियमच पाळायचे नाहीत. फक्त तुम्ही जर काही चूक केलीत, नियम मोडलेत, तर तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही”, असंही हर्ष सिंघवी यांनी नमूद केलं.
गुजरातमध्ये कोणत्या चुकीसाठी किती दंड?
गुजरात हे दारूबंदीचं राज्य आहे. तिथे दारू पिऊन गाडी चालवल्यास १० हजार रुपयांता दंड किंवा सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास २५ हजार रुपये दंड किंवा तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. तर ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
तामिळनाडूमध्ये दंडाच्या रकमेत वाढ!
एकीकडे गुजरातमध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये दंडच माफ करण्यात आला असताना दुसरीकडे तामिळनाडूमध्ये मात्र दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. रस्त्यांवर बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांना पहिल्या चुकीसाठी पाच हजार रुपये तर दुसऱ्यांदा चूक केल्यास १० हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद तामिळनाडूनं केली आहे.