भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते (CPI) कन्हैया कुमार यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी औपचारिकरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. याचं कारण त्यांनी स्वतः सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. मी अपक्ष आमदार आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास मला अपक्ष आमदार म्हणून काम करता येणार नाही. या तांत्रिक कारणामुळे मी औपचारिकरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत नाहीये, असं मत जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केलं.

आमदार जिग्नेश मेवाणी म्हणाले, “मी एका तांत्रिक कारणामुळे औपचारिकरित्या आज काँग्रेसमध्ये प्रवेश करत नाहीये. कारण मी अपक्ष आमदार आहे. मी जर पक्ष प्रवेश केला तर मला आमदार म्हणून काम करता येणार नाही. मी राहुल गांधींसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. तसेच माझ्या मतदारसंघाच्या नागरिकांशीही चर्चा झाली. त्यानंतर मला असं वाटतं की मी या विचारासोबत आणि लढाईसोबत आहे हे महत्त्वाचं आहे.”

“काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसला तरी काँग्रेसच्या विचारांसोबत”

“औपचारिक प्रवेश येणाऱ्या महिन्यांमध्ये होईल. राहुल गांधी यांनी देखील पावती भरून सदस्य होण्याची गोष्ट उद्याही करता येईल असंच सांगितलं. तसेच आत्ता आपल्या मतदारसंघातील नागरिकांसोबत उभं राहण्यास सांगितलं. मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसला तरी या विचारासोबत जोडलो गेलो आहे,” असंही मेवाणी यांनी नमूद केलं.

“दिल्लीच्या रस्त्यावर संविधानाची प्रत जाळली जात आहे “

जिग्नेश मेवानी म्हणाले, “गुजरातमधून सुरू झालेल्या गोष्टीने देशभरात विध्वंस केलाय. तो सर्व सर्वांच्या समोर आहे. देश म्हणून आपण अभूतपूर्व स्थितीतून जातो आहे. असं संकट या देशाने याआधी पाहिलेलं नाही. संविधानावर हल्ला होतोय. दिल्लीच्या रस्त्यावर संविधानाची प्रत जाळली जात आहे. भारत या संकल्पनेवर हल्ला होतोय. देशाच्या लोकशाहीवर हल्ला होतोय. भाऊ भावाचा शत्रू बनावा इतका द्वेष नियोजनबद्ध कटाद्वारे दिल्ली आणि नागपूर एकत्र येऊन पसरवत आहेत.”

” देशाच्या स्वातंत्र्य युद्धाचं नेतृत्व करणाऱ्या पक्षासोबत उभं राहायला हवं”

“अशा परिस्थितीत एक नागरिक म्हणून माझ्यासाठी देशाचं संविधान आणि भारताची संकल्पना वाचवणं पहिलं कर्तव्य आहे. त्यासाठीच देशाचं संविधान, लोकशाही आणि भारताची संकल्पना वाचवण्याचं मी ठरवलं आहे. त्यासाठी मी देशाच्या स्वातंत्र्य युद्धाचं नेतृत्व करणाऱ्या पक्षासोबत उभं राहायला पाहिजे,” अशी भूमिका आमदार मेवाणी यांनी मांडली.

“२०२२ ची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावरच लढणार”

जिग्नेश मेवाणी म्हणाले, “मी आज तांत्रिक कारणामुळे औपचारिक काँग्रेस प्रवेश केलेला नसला तरी मी २०२२ ची गुजरात विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावरच लढेल. काँग्रेसच्या सर्व प्रचार अभियानांचा भाग असेल. आज देशात जे घडत आहे ते सर्व आम्ही गुजरातमध्ये पाहिलेलं आहे आणि सहन केलेलं आहे. ३ हजार किलोग्रॅम ड्रग्ज १५ ते २० लाख बेरोजगार युवकांना नशेत गुंतवण्यासाठी अदानींच्या बंदरावर उतरवण्यात आलं. आज महागाई आणि बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर आहे. त्यावेळी गुजरात आणि देशातील युवकांना रोजगार देण्याऐवजी त्यांना नशेच्या आहारी लोटलं जातंय.”

Story img Loader