मागील काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने अदाणी प्रकरणावरून भाजपाला लक्ष्य करीत आहेत. शनिवारी त्यांनी एक कार्ड ट्वीट करीत भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस सोडून गेलेल्या पाच नेत्यांनाही लक्ष्य केले होते. दरम्यान, राहुल गांधी यांच्या ट्वीटला आता गुलाम नबी आझाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांचे विदेशात ‘नको’ त्या उद्योगपतींशी संबंध असल्याचे ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – राहुल गांधींचं Word Puzzle ट्वीट चर्चेत! गुलाम, शिंदे, हिमंतांसह ‘ही’ नावं घेत म्हणाले, “अदाणी……”
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
शनिवारी राहुल गांधी यांनी एक पझल कार्ड ट्वीट केले होते. या कार्डमध्ये गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस सोडून गेलेल्या पाच नेत्यांची नावे होती. या नावांमध्ये अदाणी हे नाव कसे लपले आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला होता. तसेच लोक सत्य लपवतात म्हणूनच रोज लोकांची दिशाभूल करतात. अदाणींच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुणाचे आहेत, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.
गुलाम नबी आझादांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर
दरम्यान, राहुल गांधी यांच्या ट्वीटला गुलाम नबी आझाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांना राहुल गांधींच्या या ट्वीटबाबत विचारण्यात आले होते. या संदर्भात बोलताना, राहुल गांधी आणि गांधी परिवाराचे विदेशातील नको त्या उद्योपतींशी संबंध आहेत. मी याची १० उदाहरणे देऊ शकतो. विदेशात ते कोणाला भेटायला जातात, हे आम्हाला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – “गौतम अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचं दिसतं”, शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
पुढे बोलताना ते म्हणाले, “भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचा प्रभाव वाढला, असे अनेक जण म्हणतात. मात्र, मला असे वाटत नाही. कारण राहुल गांधी जेव्हा सुरत न्यायालयात गेले तेव्हा त्यांच्याबरोबर एकही तरुण किंवा शेतकरी नव्हता.”
दरम्यान, अनिल ॲंटोनी यांच्या काँग्रेस सोडण्यावरूनही त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. “देशातील तरुणवर्ग राहुल गांधी यांच्यावर नाराज आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही. त्यामुळेच अनिल ॲंटोनी यांच्यासारखे तरुण नेते काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत,” असे ते म्हणाले.