दक्षिण अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बने एका बँकेत घुसून हल्ला केला त्यात सहाजण ठार झाले. नाटोची सैन्य दले माघारी जात असताना तेथे दहशतवादी हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत.
हल्लेखोर दहशतवाद्यांनी काबूल बँकेच्या लष्कर गृह येथील शाखेत घुसून बॉम्बस्फोट केला. हे ठिकाण दहशतवाद प्रवण हेल्मंड प्रांतात आहे.
आत्मघाती हल्लेखोराने प्रवेशद्वाराजवळच स्फोट केला व नंतर इतर दहशतवादी बँकेत शिरले, असे प्रांताचे प्रवक्ते ओमर झवाक यांनी सांगितले. धुमश्चक्री चालू असून, तीन पोलिसांसह सहाजण ठार झाले आहेत, तर सातजण जखमी झाले आहेत. एक हल्लेखोर ठार झाला असून, दोन अजूनही लढत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचा आज पगाराचा दिवस होता त्यामुळे ते पगार घेण्यासाठी आले असताना हा हल्ला झाला.
हेल्मंड प्रांताचे पोलीस प्रवक्ते फरीद अहमद ओबैदी यांनी सांगितले की अफगाणिस्तान पोलीस व लष्कराने दहशतवाद्यांवर कारवाई सुरू ठेवली असल्याने दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असावा. बँकेत काही नागरिक अडकले आहेत की नाही हे समजू शकले नाही. तालिबानी प्रवक्त्याने काबूल बँकेतील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. २०१० मध्ये काबूल बँक आर्थिक अडचणीत आली होती कारण तेथे ९०० दशलक्ष डॉलरचा घोटाळा झाला होता.
३१ डिसेंबरला नाटोची अफगाणिस्तानातील मोहीम तेरा वर्षांनंतर समाप्त होत असून, त्यांचे १२ हजार ५०० सैनिक तेथे सध्या आहेत. अफगाण सुरक्षा दलांना सल्ला देण्याचे काम ते करतात. अलीकडेच तालिबानी अतिरेक्यांनी लष्कराच्या बस व सुरुंग दूर करणाऱ्या पथकांवर तसेच परदेशी कार्यालयांवर हल्ले केले होते.
काबूल बँकेवर तालिबान्यांचा हल्ला, सहा ठार
दक्षिण अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बने एका बँकेत घुसून हल्ला केला त्यात सहाजण ठार झाले.
First published on: 17-12-2014 at 05:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunfight in afghan bank