तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमधील लष्कराच्या शाळेवर मंगळवारी निर्घृण हल्ला करून शेकडो निरपराध चिमुरड्यांची हत्या केली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १६० जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये शाळेतील मुला-मुलींचा समावेश आहे. हल्ल्यात १४४ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुमारे सात तासांच्या चकमकीनंतर निरपराध मुलांची हत्या करणाऱया सहा तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. या हल्ल्यामध्ये लष्कराचे जवानही मृत्युमुखी पडले आहेत. पाकिस्तानच्या भूमीला दहशतवादी कारवायांपासून मुक्त करीत नाही, तोपर्यंत तालिबान्यांविरुद्धचा लढा सुरूच राहिल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे.
पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये हे हत्याकांड झाले. मंगळवारी सकाळी शाळा सुरू झाल्यावर पहिले चार तास व्यवस्थित पार पडले झाले. मात्र, पाकिस्तानी वेळेप्रमाणे सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेच्या आवारात बंदूकीच्या फैरींचे आवाज येऊ लागले. काही शिक्षकांना सुरुवातीला हा मॉक ड्रील असल्याचे वाटले. पण काही क्षणांतच त्यांना दहशतवाद्यांनी शाळेवर हल्ला केला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हल्ला झाला, त्यावेळी वेगवेगळ्या इयत्तेतील विद्यार्थी वेगवेगळ्या कामात होते. शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांना शाळेच्या मागच्या दरवाज्यातून बाहेर काढले. त्यांनीच या हल्ल्याबाबत पत्रकारांना माहिती दिली.
दहशतवाद्यांनी लष्करी गणवेशात शाळेत प्रवेश केला. सहा दहशतवादी शाळेमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी शाळेतील विद्यार्थी आणि काही शिक्षकांना ओलीस ठेवले. दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे लहान मुलांच्या जवळ जाऊन त्यांच्या डोक्यात गोळ्या मारल्या. तालिबानी दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानी लष्कराने आमच्या कुटुंबीयांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आल्याचे तालिबान्यांनी म्हटले आहे, असे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
पेशावरमधील लेडी रिडिंग रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात येत आहे. मुलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघून अनेक पालकांना अश्रू अनावर झाले आणि या परिसरात पालकांचा आक्रोश पाहायला मिळाला. तालिबान्यांना माणुसकी आहे की नाही, असा प्रश्न अनेक पालकांनी उपस्थित केला.
हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत, असे शरीफ यांनी सांगितले. पाकिस्तानची भूमी दहशतवादी कारवायांपासून मुक्त केली जात नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहिल, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर तालिबान्यांविरुद्ध लढण्यासाठी अफगाणिस्तानचीही मदत घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री रेहमान मलिक यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. लहान मुलांचे जीव घेण्यामध्ये कोणता इस्लाम आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दहशतवाद्यांनी थेटपणे लष्कराच्या जवानांशी लढावे. याप्रमाणे शाळांमध्ये घुसून मुलांना मारण्यामध्ये कोणते शौर्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या भेकड हल्ल्याचा निषेध केला आहे. निर्घृण हत्याकांडामध्ये जीव गमावलेल्या मुलांच्या परिवाराच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असे त्यांनी ट्विटरवर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे.
सोमवारीच एका इस्लामी दहशतवाद्याने सिडनीमधील कॉफी शॉपमध्ये प्रवेश करून तेथील ग्राहकांना ओलीस ठेवले होते. सुमारे १६ तासांच्या चकमकीनंतर या दहशतवाद्याला ठार मारण्यात सिडनी पोलीसांना यश आले. या हल्ल्यामध्ये दोघांना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा