पठाणकोट येथील भारतीय वायुदलाच्या तळावर मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा मोठा स्फोट झाला. हा स्फोट मोठ्या तीव्रतेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी पुन्हा एकदा धुमश्चक्रीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला गोळीबार आज सकाळपासून थांबला होता. दरम्यान, सुरक्षा दलाच्या जवानांकडून सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत सहा दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. सुरक्षा दलाच्या जवानांकडून संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात येत असून, अजून कुठे दहशतवादी दडून बसले आहेत का, याचाही शोध घेण्यात येतो आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी येथे सुरू असलेले ऑपरेशन थांबविण्यात आल्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नव्हती. मात्र, आता पुन्हा एकदा स्फोट झाल्याने हे ऑपरेशन आणखी लांबण्याची शक्यता आहे.  ऑपरेशन आणि शोध मोहीम आणखी काही काळ सुरू राहणार असल्याची माहिती एनएसजीचे मेजर जनरल दुष्यत सिंग यांनी दिली. दरम्यान, दहशतवाद्यांच्या दुरध्वनीवरील संभाषणाचे तपशील हाती लागले असून त्यावरून हे दहशतवादी पाकिस्तानातून आले असावेत, असे एनआयएचे महासंचालक शरद कुमार यांनी सांगितले.

शनिवारी सकाळी या तळाच्या परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्याला सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. एकूण सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. भारतीय लष्कर, एनएसजी आणि हवाई दलाचे गरूडा पथक यांचा या ऑपरेशनमध्ये सहभाग आहे.
गुप्तचरांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्याच्या आधीच दहशतवादी या हवाई तळावर घुसले होते, असे आता तपासात निष्पन्न होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पठाणकोट येथील स्थितीचा उच्चस्तरीय बैठकीत सोमवारी आढावा घेतला. पुढील आठवडय़ात होणाऱ्या भारत-पाकिस्तान या उभय देशांच्या सचिव पातळीवरील चर्चेत या हल्ल्यामुळे विघ्ने निर्माण झाली आहेत. हवाईतळाच्या मागील बाजूस घनदाट जंगल असून, तेथून हे दहशतवादी घुसले होते, त्यामुळे त्यांचा माग काढणे कठीण जात आहे. जवानांचे राहण्याचे ठिकाण असलेल्या इमारतीत दोन दहशतवादी मारले गेले, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
अधिक प्रशिक्षित दहशतवादी पठाणकोट येथील हल्ल्यातील दहशतवादी प्रशिक्षित होते व त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे व दारूगोळा होता, त्यामुळे हानी पोहोचवण्याची त्यांची क्षमता जास्त होती. ही चकमक त्याचेच निदर्शक असल्याचे मानले जाते. एकातरी दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचे प्रयत्न आहेत. पहाटे साडेतीन वाजता शिफ्ट बदलत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यामुळे पाच सुरक्षा जवान मारले गेले. एनएसजीच्या एका लेफ्टनंट कर्नलचा स्फोटके निकामी करताना झालेला मृत्यू दुर्दैवी होता. २००८ च्या मुंबई हल्ल्यापेक्षा आताचे दहशतवादी प्रशिक्षित होते, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader