पठाणकोट येथील भारतीय वायुदलाच्या तळावर मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा मोठा स्फोट झाला. हा स्फोट मोठ्या तीव्रतेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी पुन्हा एकदा धुमश्चक्रीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला गोळीबार आज सकाळपासून थांबला होता. दरम्यान, सुरक्षा दलाच्या जवानांकडून सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत सहा दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. सुरक्षा दलाच्या जवानांकडून संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात येत असून, अजून कुठे दहशतवादी दडून बसले आहेत का, याचाही शोध घेण्यात येतो आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी येथे सुरू असलेले ऑपरेशन थांबविण्यात आल्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नव्हती. मात्र, आता पुन्हा एकदा स्फोट झाल्याने हे ऑपरेशन आणखी लांबण्याची शक्यता आहे. ऑपरेशन आणि शोध मोहीम आणखी काही काळ सुरू राहणार असल्याची माहिती एनएसजीचे मेजर जनरल दुष्यत सिंग यांनी दिली. दरम्यान, दहशतवाद्यांच्या दुरध्वनीवरील संभाषणाचे तपशील हाती लागले असून त्यावरून हे दहशतवादी पाकिस्तानातून आले असावेत, असे एनआयएचे महासंचालक शरद कुमार यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा