दक्षिण आफ्रिकेतील ‘गुप्तागेट’मुळे अध्यक्ष जॅकब झुमा आणि सत्तारूढ आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये तेढ निर्माण झाली असून देशातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाचे उद्योजक गुप्ता यांची कन्या वेगा गुप्ता हिच्या शाही विवाहासाठी भारतातून २०० पाहुण्यांना घेऊन आलेले विमान कोणतेही सोपस्कार पूर्ण न करता आणि संरक्षणविषयक संकेत न पाळता मंगळवारी वॉटरक्लूफ हवाई दलाच्या तळावर उतरल्याने दक्षिण आफ्रिकेत राजकीय भूकंप झाला आहे. गुप्ता कुटुंब हे अध्यक्ष झुमा यांचे निकटवर्ती असल्याने हा वाद झुमा यांच्याविरोधात केंद्रित झाला आहे.
गुप्ता कुटुंबाचा सरकारवर आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या कारभारात असलेल्या प्रभावाबद्दल पक्षसरचिटणीस ग्वेदे मंताशे यांनी पूर्वीच खाजगीत नाराजी व्यक्त केली होती. आता या विवाहासाठीचे विमान हवाई दलाच्या तळावरच उतरल्याने मंताशे यांनी जाहीरपणे टीका केली आहे.
मंताशे यांच्या समर्थकांनी आता आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे उपाध्यक्ष सिरिल राम्फोसा यांच्या मागे आपली ताकद लावली आहे. २०१७ साली राम्फोसा हे पक्षाच्या अध्यक्षपदी येण्याची चिन्हे असून त्यांचा मार्ग रोखण्याचे प्रयत्न झुमा यांनी सुरू केले होते. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जॅकसन मथेम्बु यांनी मात्र झुमा आणि मंताशे यांच्यात कोणताही तणाव असल्याचा इन्कार केला. पक्षात फूट पडावी, अशी इच्छा पूर्वापार बाळगणारेच या बातम्या पसरवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, गुप्ता विमानप्रकरणाने मंत्रिमंडळातही मतभेद निर्माण झाल्याचे माहितगारांनी सांगितले. या लग्नावर अनेक मंत्र्यांनी बहिष्कार घातला होता, याकडे या माहितगाराने लक्ष वेधले.
‘द न्यू एज’ हे वृत्तपत्र आणि सहारा कॉम्प्युटर्स या कंपन्यांची मालकी असलेल्या गुप्ता कुटुंबातील वेगा हिचा भारतीय नागरिक असलेल्या आकाश जहाजगढिया याच्याशी ३ मे रोजी सनसिटी येथे हा विवाह झाला. या विवाह सोहळ्याने काही संकेत व नियमांचा भंग झाल्याबद्दल वेगा हिचे मामा व अब्जाधीश उद्योजक अतुलकुमार गुप्ता यांनी भारत व दक्षिण आफ्रिका सरकारची जाहीर माफीही मागितली आहे.