Gurpatwant Singh Pannun Threat Call to Air India Flight : गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक विमान कंपन्यांना त्यांचं विमान बॉम्बने उडवून देण्याच्या १०० हून अधिक धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्यांमुळे हवाई वाहतूक विभाग, विमानतळं आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच त्यांचं काम वाढलं आहे. अशातच आता यामध्ये खलिस्तानी दहशतवादी गुपतवंतसिंग पन्नूने उडी घेतली आहे. पन्नूने भारतीय विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. पन्नू म्हणाला, “शीख दंगलींना ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो”. गुरपतवंतसिंग पन्नूने आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू नका असा सल्ला दिला आहे.

गुरपतवंतसिंग पन्नूने सिख फॉर जस्टीस नावाची संघटना स्थापन केली आहे. ही संघटना सातत्याने भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचं निदर्शनास आलं आहे. तसेच पन्नू हा भारतविरोधी चिथावणीखोर भाषणं देत असतो. खलिस्तानच्या नावाखाली तरुणांची माथी भडकवण्याचं काम करतो. त्यामुळे भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केलं आहे. त्याच्यावर फुटीरतावादाला प्रोत्साहन देणे, पंजाबमधील शीख तरुणांना देशाविरोधात शस्त्र उचलण्यास प्रवृत्त करणे, चिथावणीखोर भाषणं केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा >> “तो थरार ऐकून…”, १४१ प्रवाशांचे प्राण वाचवणारी जिगरबाज पायलट मैत्रेयी शितोळेचं आईकडून कौतुक!

दरम्यान, गेल्या आठवड्यात पन्नूने भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारा एक व्हिडीओ जारी केला आहे. त्याने भारताला ‘बाल्कनीज’ करण्याची धमकी दिली आहे. कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांना प्रत्युत्तर म्हणून पन्नूने हा व्हिडीओ जारी केला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ओटावा येथे झालेल्या एका जनसुनावणीला संबोधित करताना मॉरिसन म्हणाले, “कॅनडाचे धोरण अगदी स्पष्ट आहे, भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे.” मॉरिसन यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून गुरपतवंत सिंग नवा व्हिडीओ जारी केला आहे.

हे ही वाचा >> कॅनडाहून भारतात परतलेल्या उच्चायुक्तांचे जस्टिन ट्रुडोंवर गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी…”

पन्नू नेमकं काय म्हणाला?

पन्नूने ‘मिशन ऑफ एसएफजे २०२४ : वन इंडिया, टू २०४७’ या शीर्षकासह एक व्हिडीओ जारी केला आहे. याद्वारे त्याने जम्मू आणि काश्मीरसह आसाम, मणिपूर व नागालँडसारख्या देशाच्या विविध भागांत फुटीरतावादी चळवळींना प्रोत्साहन देण्याची धमकी दिली आहे. पन्नू हा एसएफजे या प्रतिबंधित संघटनेचा कायदेशीर सल्लागार व प्रवक्ता आहे, जो सार्वमताद्वारे खलिस्तान मिळवू पाहत आहे. कॅनडा आणि अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्त्व असलेल्या पन्नूने भारताचे बाल्कनायजेशन करण्याची धमकी दिली, तसेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना अरुणाचल प्रदेश परत घेण्याची विनंती केली आहे.