पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आम आदमी पक्षाचे स्थानिक आमदार शुक्रवारी सकाळी मुसेवाला यांच्या घरी पोहोचले. मात्र यावेळी त्यांना स्थानिकांनी चांगलाच विरोध केल्याचं पहायला मिळालं. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : १८ लाखांचे दागिने, ५ कोटी बँकेत, २६ लाखांची कार अन्… सिद्धू मुसेवालांकडे एकूण किती संपत्ती होती?

सिद्धू मूसेवाला यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूसा या मूळ गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला प्रचंड जनसमुदाय उसळला होता. दरम्यान या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी २४ तासांच्या आत पहिल्या आरोपीस अटक केली आहे. त्याला मन्सा येथील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एकीकडे या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु असतानाच दुसरीकडे या हत्याकांडानंतर राज्यात सत्तेत असणाऱ्या भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारवर टीका केली जात आहे. असं असतानाच आज सकाळी आपचे स्थानिक आमदार गुरप्रीत सिंग बनावली हे मुसेवालांच्या आईवडिलांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. सरदूलगढ मतदारसंघाचे आमदार असणारे गुरप्रीत हे सकाळी आठच्या सुमारास मुसेवालांच्या घरी पोहोचले.

नक्की वाचा >> मुसेवालांवर अत्यंसंस्कार: मुलाला शेवटचा निरोप देणाऱ्या आईवडिलांचे फोटो पाहून सेहवागही गहिवरला; म्हणाला, “या वेदनांचं…”

मुसेवालांच्या घराबाहेर आमदाराला अडवण्यात आलं
मुसेवालांच्या नातेवाईकांची भेट घेऊन घराबाहेर पडताना स्थानिकांनी गुरप्रीत यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळेस सरकारविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. भगवंत मान सरकारने अनेक महत्वाच्या लोकांची सुरक्षा कढून घेण्याचा निर्णय शनिवारी घेतला होता. त्यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. मात्र मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याचा दिवशी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. गाडीमधून आपल्या मित्रांसोबत प्रवास करत असतानाच मुसेवाला यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये तब्बल ३० गोळ्या झाडण्यात आल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट झालं असून यापैकी २४ गोळ्या मुसेवालांना लागल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुसेवाला यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. याच कारणामुळे आपच्या आमदाराला मुसेवालांच्या घराबाहेर अडवण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला. आपला संताप व्यक्त करण्यासाठी आणि आपच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळेच हा हल्ला झाल्याचा निषेध नोंदवण्यासाठी स्थानिकांनी आमदाराला आडवण्याचा प्रयत्न केला. तसेच सरकारविरोधी घोषणाबाजीही केल्याचं चित्र दिसलं. गुरप्रीत यांना स्थानिकांकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. पोलीस आणि समर्थकांच्या मदतीने गुरप्रीत या विरोधकांच्या गराड्यामधून बाहेर पडले.

नक्की वाचा >> विश्लेषण: मुसेवालांची हत्या AN-94; जाणून घ्या मिनिटाला १८०० गोळ्या झाडणाऱ्या या रशियन रायफलचं चीन, पाकिस्तान कनेक्शन

पुन्हा देणार सुरक्षा…
सुरक्षा व्यवस्था हटवल्यानंतर पंजाबी गायक तसेच काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली. याच कारणामुळे पंजाबमधील भगवंत मान सरकारवर चौफेर टीका केली जात आहे. असे असतानाच आता पंजाब सरकार ज्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली होती त्या ४०० महत्त्वाच्या व्यक्तींना पुन्हा एकदा सुरक्षा पुरवणार आहे. तशी माहिती सरकारने पंजाब आणि हरियाणामधील उच्च न्यायालयात दिली आहे. येत्या ७ जूनपासून या महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा बहाल केली जाईल, असं सरकारने म्हटलंय.

Story img Loader