हरियाणामधील गुरुग्राममध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत एका उच्चशिक्षित दाम्पत्याने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. ही माहिती वाचताना तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. घरकामासाठी या मुलीला आपल्या घरी आणल्यानंतर दाम्पत्याने तिच्यावर नको नको ते अत्याचार केले. गुरुग्राममधील न्यू कॉलनी येथील एका घरामध्ये घराची देखभाल करण्यासाठी एका १४ वर्षीय मुलीला कामावर ठेवण्यात आले होते. मात्र अनेक महिन्यांपासून या मुलीला अन्न-पाणी न देता तिचा छळ केला गेला. पोलिसांच्या स्टॉप क्रायसिस सेंटरला (सखी) याची माहिती मिळाल्यानंतर या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. त्यावेळी तिच्या हात, पाय आणि तोंडावर अनेक जखमा दिसून आल्या. दाम्पत्याच्या अत्याचारामुळे ही मुलगी इतकी घाबरली होती की तिला बोलताही येत नव्हते.
मुलीला रोज मारझोड केली, चटके दिले
पोलिसांनी मुलीची अवस्था पाहिल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर आता उपचार सुरु आहेत. पोलिसांनी सखी सेंटरच्या तक्रारीवरुन नराधम दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सखी सेंटरच्या प्रभारी पिंकी मलिक यांनी सांगितले की, त्यांना न्यू कॉलनीमधील एका घरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत असल्याची सूचना मिळाली होती. या मुलीला घराची देखभाल करण्यासाठी ठेवण्यात आले होते. ही मुलगी झारखंडमधील रांची येथे राहणारी आहे. हे दाम्पत्य तिच्याकडून बळजबरीने घरकाम करुन घेत होते. तिला रोज मारझोड केली जायची, तसेच गरम चिमट्याने तिला चटका दिला जायचा, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
जेवण दिले नाही, रात्री झोपू दिले जायचे नाही
आरोपी दाम्पत्य मुलीला मारझोड करत असताना तिला वेळेवर जेवण देखील देत नव्हते. तसेच तिला रात्रभर झोपूही दिले जायचे नाही. मंगळवारी सखीच्या पथकाने न्यू कॉलनीवर धाड टाकून या मुलीची सुटका केली. त्यावेळी मुलीच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा दिसून आल्या. शरीरावर चटके दिल्याचे दिसत होते. त्यासोबतच तिच्या हाता-पायावर मारझोड केल्यामुळे सूज आल्याचेही दिसत होते.
ट्विटरवर फोटो व्हायरल
दीपीका भारद्वाज नावाच्या ट्विटर अकाऊंटवर या प्रकरणाचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. या मुलीची अवस्था इतकी भयानक आहे की, ते फोटो पाहावत नाहीत. भारद्वाज यांनी ट्विटमध्ये लिहिले की, शिकले सवरलेले हे दाम्पत्य या मुलीसोबत माणुसकीला लाजवेल असे कृत्य करत होते. शरीराचा असा एकही भाग शिल्लक नाही, जिथे मारहाणीचे व्रण दिसत नाहीत. या मुलीला उष्टे फेकलेले अन्न खावे लागत होते. मला या मुलीची अवस्था पाहावली नाही, त्यामुळे सखी सेंटरकडे मी याची तक्रार केली.
आरोपी दाम्पत्य मनीष आणि कमलजीत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात. त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे. तसेच या मुलीला न्याय देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही भारद्वाज यांनी केले आहे.