गुरुग्राममधून एक थरारक घटना समोर आली आहे. पत्नीची साडी चोरली म्हणून संतापलेल्या पतीने साडी चोरणाऱ्याच्या पोटातच गोळी झाडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. गुरुग्राममधील नथुपूर गावात ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुग्राममधील नथुपूर गावात अजय सिंग त्याच्या पत्नीसह एका भाड्याच्या खोलीत राहतो. त्यांच्याच शेजारी पिंटू कुमार नामक व्यक्ती त्याच्या एका सहाकाऱ्यासह राहत होता. दरम्यान, पिंटु कुमार (३०) याने अजय सिंगच्या पत्नीची साडी चोरली असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे संतापलेल्या अजय सिंगने ड्युटीवरून येताच त्याला याबाबतचा जाब विचारला. पिंटु कुमार आणि अजय सिंग दोघेही सुरक्षा रक्षकाचं काम करतात.

हेही वाचा >> ‘बिलकीस बानो प्रकरणातल्या आरोपींना कुठल्या आधारावर मुक्त केलं?’ सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला सवाल

पिंटु कुमारला साडीविषयी जाब विचारल्यानंतर त्याने आरोप फेटाळून लावले. साडी चोरलीच नसल्याचा दावा त्याने केला. परंतु, संतापलेल्या अजय सिंग याने आपल्या खोलीतून एक पिस्तुल आणून पिंटूच्या पोटात थेट गोळी झाडली. यामुळे पिंटु जखमी होऊन खाली कोसळला.

या प्रकारानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले. पिंटूचा रूममेट आणि घटनेचा प्रत्यक्षदर्शी अशोक कुमार याने पोलिसांना सांगितले की, “भांडणाच्या वेळी सिंगने त्याच्या खोलीतून डबल बॅरल बंदूक आणली आणि पिंटूच्या पोटात गोळी झाडली.”

“आम्ही अजय सिंगची बंदूक काढून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कसा तरीही आमच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि पिंटूवर गोळी झाडली. आम्ही जखमी पिंटूला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला”, अशोकने आपल्या तक्रारीत म्हटले आहे

पिंटू हा मूळचा बिहारचा होता, तर अजय सिंग मूळचा उत्तर प्रदेशचा असून दोघेही भाड्याच्या खोलीत राहत होते. अजय सिंग याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री येथील डीएलएफ फेज ३ पोलीस ठाण्यामध्ये शस्त्रास्त्र कायद्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले, असे एसीपी (गुन्हे) वरुण दहिया यांनी सांगितले. गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला आहे.