गुरुग्राम येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनरचे सेवन केल्यामुळे पाच जणांना कथितरित्या रक्ताच्या उलट्या झाल्याचे समोर आले आहे. या पाचही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रेस्टॉरंटच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोमवारी (४ मार्च) ही घटना घडली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार अमित कुमार, त्यांची पत्नी आणि इतर मित्रमंडळी गुरुग्रामच्या सेक्टर ९० मध्ये ला फॉरेस्टा नावाच्या कॅफेत जेवण करायला गेले होते. जेवण झाल्यानंतर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना माऊथ फ्रेशनर दिले. या माऊथ फ्रेशनरचे सेवन केल्यानंतर काही वेळाने यापैकी पाच जणांना रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यांची प्रकृती बिघडायला लागली.
रेस्टॉरंटवर केले गंभीर स्वरुपाचे आरोप
ही घटना घडल्यानंतर अमित कुमार यांनी रेस्टॉरंटवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. आमची प्रकृती बिघडत असल्याचे दिसत असूनदेखील रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी आमची मदत केली नाही, असं अमित कुमार यांनी म्हटलंय. या संपूर्ण प्रकाराची अमित कुमार तसेच त्यांच्यासोबत आलेल्यांनी गुरुग्राम पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ज्यांची प्रकृती बिघडली होती, त्यांना रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी रेस्टॉरंच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.