आयपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक राज कुंद्रा दोषी असल्याचा निकाल दिला. या दोघांचाही सट्टेबाजीमध्ये सहभाग असल्याचे पुरावे आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपर किंग्ज संघाची मालकी किंवा बीसीसीआयचे अध्यक्षपद यापैकी एकाची निवड करावी. दोन्ही पदे एकाचवेळी उपभोगता येणार नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने श्रीनिवासन यांनाही दणका दिला. श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मुदगल समितीने सादर केलेल्या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुनावला.
आयपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणी न्यायालयाने १३० पानांचे निकालपत्र दिले आहे. मयप्पन यांना श्रीनिवासन यांनी पाठिशी घातल्याचा आरोप न्यायालयाने फेटाळून लावला. तसे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. बीसीसीआयचे सर्व कार्यक्रम सार्वजनिक असतात. त्यामुळे ते न्यायालयाच्या कक्षेत येतात, असेही स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर सट्टेबाजीप्रकरणी मुदगल समितीने दिलेला अहवाल सर्व नियमांचे पालन करून दिला असून, या अहवालावर फेरविचार करण्याची काहीही गरज नसल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. मुदगल समितीने राज कुंद्रा यांची बाजू नोंदवून घेतली आहे. त्यामुळे त्यांनी तक्रार करण्याचे कारण नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. श्रीनिवासन यांना आयपीएलचा संघ विकत घेता यावा, यासाठी बीसीसीआयच्या घटनेमध्ये बदल करण्याचा प्रकार गैर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. एफ. एम. आय. कलिफुल्ला यांच्या खंडपीठाने गेल्यावर्षी १७ डिसेंबरला या प्रकरणातील निकाल राखून ठेवला होता. ऑगस्ट २०१३ पासून या प्रकरणात न्यायालयाकडून वेगवेगळे अंतरिम आदेश देण्यात आले आहेत. सट्टेबाजीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने निवृत्त न्या. मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली होती. समितीने आपला अहवाल दोन भागांमध्ये न्यायालयाकडे सुपूर्द केला होता.
आयपीएल सट्टेबाजी : मयप्पन, कुंद्रा दोषी, श्रीनिवासन यांनाही दणका
आयपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक राज कुंद्रा दोषी असल्याचा निकाल दिला.
आणखी वाचा
First published on: 22-01-2015 at 03:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gurunath meiyappan raj kundra was involved in betting