पीटीआय, गुवाहाटी

आसाममधील गुवाहाटीला पश्चिम बंगालमधील न्यू जलपैगुडीशी जोडणाऱ्या ईशान्य भारतासाठीच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दूरसंवाद कार्यक्रमाद्वारे हिरवा झेंडा दाखवला.गुवाहाटी स्थानकावरून या गाडीला रवाना करण्यासाठी पंतप्रधानांनी पडद्यावर प्रतीकात्मक हिरवा झेंडा दाखवला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया व मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा या वेळी उपस्थित होते. गुवाहाटी व न्यू जलपैगुडीदरम्यानच्या या अर्ध अतिजलद (सेमी हायस्पीड) गाडीमुळे आसाम व पश्चिम बंगालमधील संपर्क आणखी वेगवान होणार आहे.

या वंदे भारत एक्सप्रेसमुळे ईशान्य भारतातील पर्यटन, शिक्षण, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल, असे पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले.
गेल्या नऊ वर्षांमध्ये ईशान्य भारतातील सर्व राज्ये रेल्वेच्या जाळय़ाने जोडली गेल्यामुळे, या भागात पायाभूत सोयींचा विकास झाल्याचे मोदी यांनी सांगितले. हा विकास कुठल्याही भेदभावाशिवाय सर्वासाठी असून, त्यातून खरा सामाजिक न्याय व सर्वधर्मसमभाव प्रतिबिंबित झाला असल्याचेही ते म्हणाले.

गुवाहाटी- न्यू जलपैगुडी वंदे भारत एक्सप्रेस हा प्रवास ५ तास ३० मिनिटांत पूर्ण करणार आहे. सध्या या मार्गावरील सर्वात जलद गाडीला हेच अंतर कापण्यास साडेसहा तास लागतात. या अत्याधुनिक रेल्वेगाडीमुळे या भागातील लोकांना वेगवान व सुखकारक प्रवासचे साधन उपलब्ध होणार असून, या भागातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधानांनी याप्रसंगी नव्याने विद्युतीकरण झालेल्या १८२ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे लोकार्पण केले, तसेच आसाममधील लुमिडग स्थानकावरील डेमू- मेमो शेडचे उद्घाटनही केले.