दलितांच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे उपोषण म्हणजे दलितांचा उपहास असल्याची टीका, भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य जीव्हीएल नरसिंहा राव यांनी केली आहे. ट्विट करून त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. विशेष म्हणजे दलित मुद्यावरून राहुल गांधी हे आजपासून राजघाट येथे उपोषण सुरू केले आहे.

राव म्हणाले की, हे दलितांच्या हितासाठी उपोषण नाही. दलितांचे कल्याण करण्याच्या नावाने ही त्यांची थट्टा सुरू आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा कॅमेऱ्याचे राजकारण करत आहेत. राहुल तुम्ही स्टंट आणि खोटेपणाचे राजकारण कधी बंद करणार ? असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू झाले आहे. राहुल हे राजघाटवर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. काँग्रेसचे कार्यकर्तेही एक दिवसांचे उपोषण करणार असून सर्व राज्य आणि जिल्हा मुख्यालयात हे आंदोलन होईल. विशेष म्हणजे भाजपानेही विरोधी पक्षांवर ससंदेचे कामकाज सुरळित चालू देत नसल्याचा आरोप करत दि. १२ एप्रिल रोजी आपले खासदार उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. सीबीएसई पेपर लीक, पीएनबी घोटाळा, कावेरी मुद्दा आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा यासारखे अनेक महत्वाचे मुद्दे सभागृहात उपस्थित केले जात नसल्याचा आरोप भाजपाने काँग्रेसवर केला आहे. उपोषणादरम्यान अॅट्रॉसिटी अॅक्टसह शेतकऱ्यांची देशातील अवस्था आणि युवकांचा झालेला अपेक्षाभंग हे मुद्देही उपस्थित केले जाणार आहेत.

संसदेचे अधिवेशन कामकाजाअभावी वाया गेले. पण भाजपाने याप्रकरणी विरोधी पक्षांना जबाबदार धरत एक दिवसाच्या उपोषणाची घोषणा केली आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी याची माहिती दिली. ते म्हणाले, विरोधी पक्षांनी संसदेचे संपूर्ण सत्र चालू दिले नाही. त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. त्याच्या विरोधात १२ एप्रिल रोजी भाजपाचे खासदार आपापल्या मतदारसंघात एक दिवसाचे उपोषण करतील.