वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने १८ डिसेंबर रोजी एका सीलबंद लिफाफ्यात हा अहवाल वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे सोपवला होता. ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर पूर्वी एक मोठं हिंदू मंदिर अस्तित्त्वात होतं, असं या अहवालात नमूद करण्यात आलं असल्याचा दावा हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी केला आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर दोन्ही पक्षकारांना यामधील निष्कर्षांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल, असं न्यायालयानं म्हटलं होतं. दरम्यान, विष्णू शंकर जैन यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या अहवालातील काही महत्त्वाच्या मुद्दयांची माहिती दिली. त्याचबरोबर याचिकाकर्त्या सीता साहू यांनीदेखील अहवालातील काही मुद्दे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीता साहू म्हणाल्या, ज्ञानवापी मशिदीचं दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. याआधी आयुक्तालयामार्फत सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या दोन्ही सर्वेक्षणांमधून सत्य समोर आलं आहे. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तिथे मंदिराचे अवशेष पाहिले आहेत. सर्वेक्षणादरम्यान, जुनी नाणी सापडली आहेत. अतिप्राचीन काळातील नाणी सापडली आहेत. मंदिराचे अवशेषही आहेत. खंडित केलेल्या मूर्ती आणि सीलिंगजवळ काही नक्षीकाम आहे, ज्याद्वारे स्पष्ट होतंय की, हे पूर्वी मंदिर होतं. सर्वेक्षणादरम्यान, काही शिलालेख आढळले आहेत. संस्कृत भाषेत लिहिलेले शिलालेखही या परिसरात आढळले आहेत. इतर काही जुन्या भारतीय भाषांमधले शिलालेखही या ठिकाणी आहेत, जे सिद्ध करतात की या जागेवर पूर्वी मंदिर होतं.

याचिकाकर्त्या म्हणाल्या, काही लोक केवळ घुमटाचा दाखला देऊन दावा करतात की ती मशीद आहे. परंतु, त्या घुमटाखाली मंदिराचे अवशेष आहेत. तो घुमट आपल्या गुलामीचं प्रतीक आहे. ही गोष्ट सिद्ध करण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. तिथे मंदिर होतं आणि मंदिरच राहणार. आगामी काळात तिथल्या वजूखान्याचं सर्वेक्षण केलं जाईल. त्यानंतर आमचे भोले बाबा (भगवान शंकर) स्वतंत्र होतील, नंदी महाराज स्वतंत्र होतील. आम्ही आता सीलिंगचं सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. त्यातून सत्य समोर येईल.

हे ही वाचा >> ‘ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी हिंदू मंदिर होते’, ASI अहवालाचा हवाला देत हिंदू पक्षकारांचा दावा

दरम्यान, हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, महामुक्ती मंडप असा शब्द लिहिलेला एक शिलालेख मशिदीच्या आवारात सापडला आहे. हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे असं पुरातत्त्व विभागाने म्हटलं आहे. सर्वेक्षणादरम्यान शिलालेखांच्या दगडाचे तुकडे मिळाले आहेत. या शिलालेखाचे इतर तुकडे पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आधीपासूनच आहेत. त्याचबरोबर मशिदीच्या तळघरात हिंदू देवदेवतांच्या अनेक मूर्ती पुरल्या गेल्या होत्या. त्या मूर्ती पुरातत्त्व विभागाला मिळाल्या आहेत. तसेच मशिदीच्या पश्चिम दिशेला असणारी भिंत ही हिंदू मंदिराची असल्याचं या सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. येथे असलेल्या हिंदू मंदिराचा ढाचा १७ व्या शतकात पाडला गेला. त्यानंतर या मंदिराच्या ढाचाचा आधार घेऊन सध्याच्या इमारतीचा ढाचा उभारला गेला, असंही या अहवालात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gyanvapi asi survey hindu petitioner sita sahu says got proof of temple will request mosque other parts survey asc
Show comments