Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीच्या संपूर्ण परिसराचा सर्व्हे भारतीय पुरातत्त्व खात्याने करण्याचा आग्रह धरण्याच्या याचिकेवर मुस्लिम पक्षाने आक्षेप घेतला आहे. वाराणसी येथील कोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान ज्ञानवापी मशिद समितीने असं म्हटलं आहे की मुघल बादशाह औरंगजेब हा क्रूर नव्हता. तसंच औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिरही तोडलेलं नाही. काशी विश्वनाथच नाही तर औरंगजेबाने हिंदू मंदिरं तोडलेली नाहीत. या प्रकरणात हिंदू पक्षाने दावा केला की विश्वेश्वर मंदिर मुस्लिम आक्रमणांमध्ये तोडण्यात आलं होतं. १५८० मध्ये राजा टोंडल मलने या ठिकाणी मंदिर बांधलं होतं. यावर अंजुमन इंतेजामिया मशिद कमिटीने आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.
मशिद समितीने गेल्या वर्षी ज्ञानवापी मंदिराच्या परिसरात शिवलिंग सापडल्याचा दावाही खोडून काढला आहे. ज्ञानवापी मंदिरात कुठलंही शिवलिंग आढळून आलं नाही. शिवलिंग सापडल्याचा जो दावा केला जातो आहे तो एक कारंजा आहे दुसरं काहीही नाही. मुस्लिम शासकांनी आक्रमण केल्याचा, औरंगजेबाने मंदिरं तोडल्याचा दावाही खोडून काढण्यात आला आहे. असे दावे हिंदू पक्षकारांकडून करण्यात येत आहेत कारण हिंदू-मुस्लिम समाजात त्यांना तेढ निर्माण करायची आहे, तिरस्कार निर्माण करायचा आहे असंही मशिद कमिटीने म्हटलं आहे. एबीपी न्यूजने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीचा वाद काय?
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिद यांच्यातला वाद काही प्रमाणात अयोध्येसारखाच आहे.या वादामध्ये अनेक पैलू आहेत. अयोध्या प्रकरणात मशिद होती आणि मंदिर तयार झालं नव्हतं. मात्र या प्रकरणात मंदिर आणि मशिद दोन्ही तयार आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू पक्षकारांचं म्हणणं हे आहे की मशिद तिथून हटवण्यात यावी आणि ती जमीन मंदिराला मिळावी. कारण ही मशिद मंदिर तोडून बांधण्यात आली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मशिद हटवण्यात यावी आणि ती जागा आम्हाला देण्यात यावी असं हिंदू पक्षकरांचं म्हणणं आहे. १६६९ मध्ये औरंगजेबाने ते मंदिर तोडलं आणि तिथे मशिद बांधली. मशिद तयार करण्यासाठी मंदिर तोडल्यानंतर जे अवशेष होते त्यांचाही वापर करण्यात आला असाही दावा करण्यात आला आहे. मात्र हा दावा मुस्लिम पक्षकारांनी खोडला आहे.