वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या ‘शिवलिंगा’चा काळ कार्बन डेटिंग पद्धतीने शोधण्याची मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळली आहे. चार हिंदू महिलांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने १२ सप्टेंबरला दाखल झालेली ही याचिका स्वीकारली होती. तसंच मशिदीच्या व्यवस्थापनाने यावर आपलं म्हणणं मांडावं, असे आदेशही देण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान वाराणसी न्यायालयाने कार्बन डेटिंगसारखे सर्व्हे केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होईल असं सांगत याचिका फेटाळून लावली.

Gyanvapi Row: नंदीपासून ८३ फुटांवर ‘शिवलिंग’; भिंतींवर त्रिशूल आणि हत्तीचं चिन्हं; ज्ञानवापीमधील आणखी एक व्हिडीओ समोर

सर्वोच्च न्यायालयाने शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवण्यास सांगितलेलं असताना कार्बन डेटिंगसारखे सर्व्हे केल्याने आदेशाचं उल्लंघन होईल असं वाराणसी कोर्टाने सांगितलं आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाने शिवलिंगाची सुरक्षा करण्यास सांगितलेलं असताना त्याला कोणतंही नुकसान झालं तर तेदेखील आदेशाचं उल्लंघन ठरेल असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

तसंच शिवलिंगला काही नुकसान झालं तर धार्मिक भावना दुखावतील आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर कायदेशीर तोडगा निघणार नाही असंही न्यायालयाने मागणी फेटाळताना सांगितलं.

ज्ञानवापीमधील ‘शिवलिंगा’चा काळ शोधणार? ; कार्बन डेटिंगची मागणी करत वाराणसी न्यायालयात याचिका

मशीद व्यवस्थापनाने मात्र अशा कोणत्याही प्रकारचा तपास करण्यास विरोध केला आहे. हे प्रकरण मशिदीच्या आतील मंदिरात पूजा करण्याबद्दल आहे आणि त्याचा त्याच्या संरचनेशी काहीही संबंध नाही असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. मुस्लिम पक्षकारांनी हे शिवलिंग नसून पाण्याचे कारंजे असल्याचा दावा केला आहे.

मशिदीच्या भिंतीनजीक असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती तसेच शृंगारदेवी मंदिरात दररोज पूजा करण्याची परवानगी द्यावी, यासाठी याचिकाही न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणात मशिदीच्या वझुखान्याजवळ सापडलेली वस्तू प्राचीन शिवलिंग असल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा असून हे केवळ कारंजे असल्याचे मशीद व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. पूजेच्या मागणीवरील याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही.

Story img Loader