उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील ज्ञानवापीमध्ये कोर्टाच्या आदेशानुसार १४ मे ते १६ मे दरम्यान करण्यात आलेल्या सर्व्हेचे व्हिडीओ सोमवारी (३० मे) हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांना सोपवण्यात आले. दरम्यान या सीडीमधील काही व्हिडीओ लीक झाल्याचा आरोप हिंदू पक्षकारांनी केला आहे. याप्रकरणी मंगळवारी कोर्टाकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. या व्हिडीओंमध्ये शिवलिंग, त्रिशूल अशी चिन्हं दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.
‘ज्ञानवापी’कडून ज्ञान-सागराकडे!
विश्लेषण : काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणावर सुरू असेलला वाद नेमका काय?
एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, व्हिडीओमध्ये वजूखानामधील (मशिदीमध्ये प्रवेश करताना पाय धुण्यासाठी वापरली जाणारी जागा) पाणी काढण्यात आल्यानंतरचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ कोर्टाच्या आदेशानंतर काढण्यात आले आहेत. पाणी कमी झाल्यानंतर शिवलिंग दिसत असल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा आहे. मात्र मुस्लिम पक्षकारांनी हे शिवलिंग नसून पाण्याचे कारंजे असल्याचं म्हटलं आहे.
नंदीपासून ८३ फुटांवर वजूखाना
ज्ञानवापी परिसरात एक नंदी दिसत असून त्याच्या समोर ८३ फुटांवर वजूखाना आहे. याच ठिकाणी शिवलिंगसारखी आकृती सापडली आहे. नंदीचं तोंड नेहमी शिवलिंगच्या दिशेने असतं असं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे. पण मुस्लिम पक्षकार मात्र हे पाण्याचे कारंजे असल्याच्या दाव्यावर ठाम आहेत.
हिंदू पक्षकारांच्या बाजूने अर्ज दाखल करणाऱ्या महिला सर्व्हेचा रिपोर्ट घेऊन कोर्टातून बाहेर आल्यानंतर विजयाच्या दिशेने पाऊल पडल्याचा दावा करत होत्या. मात्र अद्याप कोर्टाने या फोटो, व्हिडीओंसंबंधी कोणताही निर्णय दिलेला नाही.
भिंतींवर त्रिशूलचं चिन्ह
ज्ञानवापीमधील जे व्हिडीओ लीक झाले आहेत त्यामध्ये काही अशा गोष्टीही दिसल्या आहेत ज्याच्या आधारे हिंदू पक्षकार आपली बाजू भक्कम झाल्याचं मानत आहेत. मशिदीमधील आतील भिंतींवर त्रिशूलचं चिन्ह दिसत आहे. भिंतीवर फक्त एका नाही तर अनेक ठिकाणी हे चिन्ह पाहण्यास मिळत आहेत. रंग मारत हे लपवण्याचा प्रयत्न झाल्याचाही हिंदू पक्षकारांचा दावा आहे.
याशिवाय भिंतींवर काही कलाकृती साकारण्यात आलेली असून यामध्ये हत्तीचं चित्र दिसत आहे. हिंदू पक्षकार हे सर्व मंदिर असल्याचा पुरावा मानत आहेत. स्वास्तिकचं चिन्ह भिंतीवर दिसल्याचा दावाही केला जात आहे. मात्र फोटोत स्वस्तिक स्पष्ट दिसत नाही आहे. मशिदीच्या बाहेरील भिंतीवरही अशा काही गोष्टी दिसल्या आहेत. या ठिकाणी फुलं आणि घंटी यांचं चिन्ह दिसत आहे.
सीबीआय तपासाची मागणी
व्हिडीओ लीक झाल्याप्रकरणी सीबीआय तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. राखी विसेन सिंह आणि जितेंद्र सिंह यांनी ही मागणी केली आहे. यााधी त्यांनी व्हिडीओ लीक झाल्याची शंका व्यक्त केली होती. सर्व्हे टीममध्ये सहभागी एखाद्या व्यक्तीने व्हिडीओ लीक केला असावा असा त्यांचा दावा आहे. मात्र त्यांनी कोणाचंही नाव घेण्यास नकार दिला आहे.