वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या ‘शिवलिंगा’चा काळ कार्बन डेटिंग पद्धतीने शोधण्याबाबत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने याचिका स्वीकारली असून त्यावर २९ सप्टेंबरला सुनावणी होईल. तत्पूर्वी मशिदीच्या व्यवस्थापनाने यावर आपले म्हणणे मांडावे, असे आदेश देण्यात आले.
मशिदीच्या भिंतीनजीक असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती तसेच शृंगारदेवी मंदिरात दररोज पूजा करण्याची परवानगी द्यावी, यासाठी याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणात मशिदीच्या वझुखान्याजवळ सापडलेली वस्तू प्राचीन शिवलिंग असल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा असून हे केवळ कारंजे असल्याचे मशीद व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यां हिंदू महिलांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी कथित शिवलिंगाचा कालखंड कार्बन डेटिंग पद्धतीने काढण्याची मागणी केली.