ज्ञानवापी मशीद प्रकरणात वाराणसी सत्र न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे. हिंदू पक्षाने दाखल केलेली याचिका सुनावणीयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर, मुस्लीम पक्षकारांची याचिका वाराणसी न्यायालयाने फेटाळली आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे. न्यायालयाच्या या निकालावर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ओवेसी म्हणाले, “ वाराणसी न्यायालयाचा आज जो आदेश आला आहे, त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील व्हावे, असे माझे मत आहे. मला आशा आहे की अंजुमन इंतेजामिया मशीद समिती या आदेशाविरुद्ध अपील करेल. मला वाटतं की या आदेशानंतर प्रार्थनास्थळ कायदा १९९१ चा उद्देश नष्ट होईल. आपण त्या मार्गावर जात आहोत, ज्या मार्गावर बाबरी मशिदीचा मुद्दा होता. जेव्हा बाबरी मशिदीबाबत निकाल देण्यात आला होता, तेव्हा मी सर्वांना इशारा दिला होता की, यामुळे देशात समस्या निर्माण होतील, कारण हा निकाल श्रद्धेच्या आधारावर देण्यात आला होता.”

ज्ञानवापी मशीद परिसरात असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पुजेच्या परवानगीसाठी पाच हिंदू महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या याचिकेवरील निकाल जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी गेल्या महिन्यात राखून ठेवला होता. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाराणसीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ज्ञानवापीनंतर मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी व्हिडीओग्राफीद्वारे होणार सर्वेक्षण, उच्च न्यायालयाचे आदेश

‘अंजुमन इंन्तेझामिआ मशीद समिती’ने ज्ञानव्यापी मशिदीची जागा वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचा दावा करत हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. तर या जागेवर असलेले मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधण्यात आली, असा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला होता. दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने या मशिदीचे व्हिडीओ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणादरम्यान या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला होता. हा दावा मुस्लीम पक्षाने फेटाळून लावला आहे.

Story img Loader