Abu Qatal killed in Pakistan : लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेतील क्रूरकर्मा अबू कताल उर्फ कताल सिंघी हा शनिवारी (१५ मार्च) रात्री पाकिस्तानमध्ये एका हल्ल्यात ठार झाला आहे. कताल हा जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. तसेच तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेमधील महत्त्वाचा ऑपरेटिव्ह होता. कताल हा २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा साथीदार होता.

पाकिस्तानमधील झेलम येथे शनिवारी सायंकाळी अबू कतालवर गोळीबार झाला. त्यावेळी हाफिज सईद देखील त्याच्याबरोबर होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर हाफीज सईदने तिथून पळ काढला. तेव्हापासून तो बेपत्ता आहे.

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोडी मंदिरातून परतणाऱ्या तीर्थयात्रेकरूंच्या बसवर झालेला दहशतवादी हल्ला (९ जून) हा अबू कतालनेच घडवून आणला होता. त्या हल्ल्यात अनेक भाविकांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या दोषारोप पत्रातही अबू कताल याचं नाव नमूद करण्यात आलं होतं. १ जानेवारी २०२३ रोजी राजौरी जिल्ह्यातील धनगरी गावात हा दहशतवादी हल्ला झाला होता.

राजौरी येथील दहशतवादी हल्ल्यामागचा सूत्रधार ठार

राजौरी येथे झालेल्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं होतं. या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी याच भागात आयईडी स्फोट देखील झाले होते. त्यामध्ये दोन लहान मुलांसह सात जण मरण पावले होते, तर या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले होते. एनआयएच्या तपासात समोर आलं होतं की पाकिस्तानमध्ये बसलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांनी या हल्ल्याचा कट रचला होता. त्यामुळे अबू कतालही होता. त्याच्याबरोबर मोहम्मद कासिम व साजिद जट्ट हे दोघेही या कटात सहभागी होते. कताल व साजिद हे दोघे पाकिस्तानी नागरिक होते. तर कासिम मूळचा पाकिस्तानी नव्हता.

अबू कतालचे मारेकरी कोण?

अबू कताल लष्करमध्ये दहशतवाद्यांची भरती करण्याचं काम करत होता. तसेच त्याने जम्मू-काश्मीरमधील अल्पसंख्याक समुदायावर अनेक हल्ले घडवून आणले होते. भारतीय लष्कर, सुरक्षा यंत्रणा व गुप्तहेर यंत्रणा अबू कतालवर लक्ष ठेवून होती. अखेर शनिवारी रात्री अबू कताल ठार झाला. मात्र, त्याचे मारेकरी कोण हे अद्याप समोर आलेलं नाही.