भारताकडून पाकिस्तानने विजेची खरेदी करू नये असा इशारा मुंबई हल्ल्यात सामील असलेला ‘जमात उद दावा’चा म्होरक्या हाफिज सईद याने तेथील सरकारला दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताकडून वीजखरेदीची चाचपणी करण्यासाठी त्यांच्या ऊर्जामंत्र्यांना भारतास भेट देण्याचा आदेश दिला असतानाच हाफिज सईदने हा इशारा दिला आहे. सध्या पाकिस्तानात विजेचे संकट गडद झाले असून, त्यावर तोडगा काढण्यास शरीफ सरकारने प्राधान्य दिले असून, भारताकडून वीजखरेदीचा पर्याय ठेवला आहे.
शेखुपुरा येथे झालेल्या उम्मत परिषदेत सईद म्हणाला, की भारत हा पाकिस्तानी नद्यांच्या पाण्यावर वीजनिर्मिती करीत आहे व तीच वीज विकत आहे, हे आमच्या राज्यकर्त्यांच्या कसे लक्षात येत नाही.
सईद याला पकडण्यासाठी अमेरिकेने १ कोटी डॉलरचे इनाम लावलेले आहे, तरी तो पाकिस्तानातील पंजाब प्रांत व इतर ठिकाणी खुलेआम हिंडत आहे, वरून पाकिस्तान सरकारला धमकावत आहे. तो म्हणाला, की भारताकडे विजेची भीक मागण्याची गरज नाही.
पाकिस्तानमधील विजेचा तुटवडा दूर करण्यासाठी भारत व चीन या देशांकडून वीजखरेदी करण्याचा शरीफ सरकारचा प्रस्ताव आहे. अर्थमंत्री इशाक दर यांनी सांगितले, की भारत पाकिस्तानला २००० मेगावॉट वीज विकत देण्यास तयार आहे व भारताकडून वीजखरेदी करण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत.
पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारत-पाकिस्तान संयुक्त व्यापार मंडळाच्या सदस्यांना गेल्या आठवडय़ात असे सांगितले, की जल व ऊर्जामंत्री ख्वाजा महंमद आसिफ यांनी भारताला भेट द्यावी व दोन्ही देशांत सहकार्याच्या क्षेत्रांचा आढावा घ्यावा, त्यात वीज विकत घेण्याबाबतही चर्चा करावी.