जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यांचा मास्टरमाईंड हाफिज सईद याने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. मशरिकी पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) चा बदला घ्यायचा असेल तर काश्मीर हा त्यासाठीचा मार्ग आहे. सूड घेण्यासाठी काश्मीरमधून आपण वाट काढू असे आवाहन हाफिज सईदने केले आहे. लाहोरमध्ये झालेल्या सभेत तो बोलत होता. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका यांनी हाफिज सईदला दहशतवादी घोषित केले आहे. तर दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच नजरकैदेतूनही त्याची सुटका केली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातली बातमी दिली आहे.
Mashriqi Pakistan (East Pakistan) ka badla lena hai toh, Kashmir se intequam ka rasta ban raha hai, nikal raha hai, chal raha hai aur Inshallah yeh tehreek jaari hai, isne bahut aage jana hai: Jammat-ud-Dawah’s Chief Hafiz Saeed in Lahore, Pakistan pic.twitter.com/BK6UxKbCTk
— ANI (@ANI) December 16, 2017
अमेरिकेने तर हाफिज सईदवर १ कोटी रूपयांचे बक्षीसही ठेवले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना शिक्षा देण्याबाबत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत गंभीर नाही अशी प्रतिक्रिया भारताने हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर दिली होती. आता याच हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकत १९७१ चा बदला घ्यायचा आहे असे म्हटले आहे.
आठवड्याभरापूर्वीच पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्ऱफ यांच्यासबोत हाफिज सईद युती करणार असल्याचीही बातमी आली होती. नजरकैदेतून सुटका होताच हाफिज सईदने २०१८ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. एवढेच नाही तर जमात उद दावा या दहशतवादी संघटनेने ऑगस्ट महिन्यात मिल्ली मुस्लिम लीग या पक्षाचीही स्थापना केली आहे. खरेतर हाफिजच्या नजरकैदेत वाढ करण्याची मागणी पाकिस्तान सरकारने केली होती. मात्र पुराव्यांअभावी त्याची नजरकैदेतून सुटका करण्यात आली. आता मोकाट हाफिज सईदने भारताविरोधात गरळ ओकून बांगलादेशचा बदला घेणार असल्याची घोषणा केली आहे.