मागच्या वर्षी मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला मदत केल्यानंतर एका आश्रमाचा शिक्षक चर्चेत आला होता. सदर अल्पवयीन पीडित मुलगी जवळपास एक तास मदत मागण्यासाठी दारोदार भटकत होती. पण तिला कुणीही मदत केली नाही, पण एका आश्रमाचा शिक्षक पुढे आल्यामुळे त्याचे सगळीकडे कौतुक झाले होते. मात्र आता याच शिक्षकाला अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आता आश्रमातील शिक्षक आणि केअरटेकरला तीन मुलांवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे.

उज्जैन पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत विविध कलमे लावून २१ वर्षीय शिक्षक राहुल शर्मा आणि आश्रमातील केअरटेकर अजय ठाकूर यांना अटक केली आहे. दोघांनाही सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात आणखी अल्पवयीन मुले पीडित असण्याची शक्यता आहे. पण भीतीमुळे ते पुढे आलेले नाहीत.

उज्जैनचे पोलीस अधिक्षक प्रदीप शर्मा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत तीन मुलांनी पुढे येऊन त्यांच्यावरील अत्याचाराची तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उज्जैनमधील या आश्रमात गरिब कुटुंबातील मुलांना पंडीत (पुजारी) बनण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. सदर आश्रम राज्याच्या संस्कृत बोर्डाशी संलग्न आहे.

दहा दिवसांपूर्वी सुट्टीनिमित्त आश्रमातून आपल्या घरी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचाराची वाच्यता पालकांसमोर केली. यानंतर पालकांनी मुलाला घेऊन आश्रम गाठले. पालकांच्या तक्रारीनंतर लैंगिक अत्याचार करणाऱ्या केअरटेकर ठाकूरला कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर एकामागोमाग अनेक पालकांनी आश्रमात येऊन लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार नोंदविली.

अनेक पालकांनी शिक्षक शर्मावर आरोप केल्यानंतर आणि आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांशी वाद घातल्यानंतर आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावले. मात्र पोलिसांनी शर्माला ताब्यात घेतले. यानंतर आश्रमाचे अधिकारी गजानंद म्हणाले, आम्ही पोलिसांना आमची मदत करण्यासाठी बोलावले होते. पण त्यांनी आमच्याच कर्मचाऱ्याला अटक केली. आश्रमावर लावलेले आरोप खोटे आहेत.

तथापि पोलिसांचे म्हणणे आहे की, ते जेव्हा आश्रमात पोहोचले, तेव्हा प्राथमिक चौकशीनंतर शिक्षक शर्मा संशयित असल्याचे समजले. या प्रकरणात आणखीही पीडित मुले असू शकतात. गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही त्यांची समजूत घालत आहोत. साधे कपडे घातलेल्या पोलिसांनीही त्यांच्याशी संवाद साधून विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. पण मुले घाबरले असल्यामुळे ते काही बोलण्यास तयार नाहीत.

Story img Loader