मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे खबरदारी म्हणून भारताने प्रतिबंधक उपायांच्या अमलबजावणीला सुरुवात केली आहे. दरम्यान चीननंतर करोना संसर्ग आता अन्य देशांतही फोफावताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनहून इटलीमध्ये आलेल्या दोन विमानांमध्ये तब्बल ५० टक्के प्रवाशांना करोनाची लागण झालेली आहे.
हेही वाचा >>> गौतम अदाणींची नरेंद्र मोदींशी किती जवळीक? राजीव गांधींचे नाव घेत खुद्द अदानींनीच सांगितले; म्हणाले “माझ्यावर वेगवेगळे…”
ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार चीनहून आलेली दोन विमाने इटलीमध्ये उतरली होती. या विमानांमधील प्रवाशांची नंतर चाचणी करण्यात आली. चाचणीनंतर जवळपास ५० टक्के प्रवाशांना करोनाचा संसर्ग असल्याचे समोर आले. यातील बहुतांश रुग्णांना कोणतीही लक्षणं नव्हती. या रुग्णांवर आता उपचार करण्यात येत आहेत.
हेही वाचा >>> कर्नाटकमध्ये शाळा, कॉलेजमध्ये मास्क बंधनकारक, करोना नियमांचेही करावे लागणार पालन!
चीनमधील करोना संसर्गामुळे इटलीमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. करोना संसर्ग पसरू नये म्हणून येथील सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चीनमधून इटली देशात येणाऱ्या सर्वच प्रवाशांना करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री ओराझीओ स्चिलासी यांनी दिली आहे.
“चीनमधून येणाऱ्या तसेच इटलीमधून प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. करोनाच्या उपप्रकारांवर अभ्यास करण्यासाठी तसेच इटलीच्या जनतेला करोना संसर्गापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे स्चिलासी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, चीन सरकारने झिरो कोविड धोरण मागे घेतल्यापासून तेथे करोना संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याच कारणामुळे अमेरिका, जपान, भारत, दक्षिण कोरिया, तैवान, मलेशियाय या देशांनी चीमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची करोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे.