गोव्यातील काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी केली तर निम्म्याहून अधिक नोकरशहांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे. लघुउद्योजकांच्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी यापूर्वीच्या कामत सरकारवर चौफेर टीका केली.
गेल्या सरकारमधील अनियमिततेमध्ये सामील नाही, असा स्थानिक अधिकारी सापडणे दुर्मीळ आहे. नोकरभरतीसारख्या घोटाळ्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. मी जर कठोर भूमिका घेतली असती तर निम्मे अधिकारी तुरुंगात जातील. त्यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागेल, असे पर्रिकर म्हणाले. प्रशासन सुरळीत चालण्यासाठी आपल्याला दीड वर्षांचा कालावधी लागला यावरून यापूर्वीच्या कामकाजाची कल्पना येऊ शकेल, असा टोला त्यांनी लगावला. या अधिकाऱ्यांच्या विरोधात आपल्याकडे थेट पुरावे आहेत. मी सूत्रे हातात घेतली तेव्हा प्रशासन ठप्प होते. अधिकाऱ्यांना कारवाईची चिंता होती. त्यामुळे तत्कालीन मंत्र्यांच्या सांगण्यावरून तुम्हाला हे गैरप्रकार करावे लागले हे तपास अधिकाऱ्यांना सांगा, असे या बाबूंना सांगावे लागल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. दिगंबर कामत सरकारने भ्रष्टाचाराने प्रशासन पोखरून टाकल्याचा आरोपही पर्रिकर यांनी केला. या सरकारने भ्रष्टाचाराबरोबर प्रशासन संपवून टाकण्याचे दुष्कृत्य केल्याची टीका पर्रिकर यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा