हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हनियेची इराणच्या तेहरानमध्ये ३१ जुलै रोजी हत्या झाली. ही हत्या इस्रायलने केल्याचा आरोप हमास आणि इराणकडून करण्यात येत आहे. पण याबाबत इस्रायलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हमासचा राजकीय नेता इस्माइल हनियेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी थेट इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सच्या हवाल्याने हिस्तुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृत्तानुसार, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी तेहरानमध्ये हमास नेते इस्माईल हनीयेहच्या हत्येचा बदला म्हणून इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. इस्माइल हनियेच्या मृत्यूची अधिकृत घोषणा झाल्यानंतर काही वेळातच इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीत हा आदेश जारी केला. हनियेच्या हत्येचा बदला घेण्याच्या अनुषंगाने अयातुल्ला अली खमेनी यांनी हे आदेश दिल्याने पश्चिम आशियातील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींवर आता अमेरिकेची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

हेही वाचा : हमास नेत्याची इराणमध्ये हत्या,इस्रायलवर संशय; पश्चिम आशियातील तणाव वाढण्याची शक्यता

अमेरिकेची प्रतिक्रिया काय?

इस्माइल हनियेची हत्या आणि त्यानंतर इराणने इस्रायलवर हल्ला करण्याच्या दिलेल्या आदेशावर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रमुख उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी म्हटलं की, “इराण ही एक अशी राजवट आहे जी १९७९ पासून दहशतवादाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. त्याच्या स्वतःच्या लोकांना दडपण्याचाच नाही तर संपूर्ण प्रदेशात अस्थिर करणाऱ्या कृतींना निधी पुरवणे आणि प्रोत्साहन देणे यांचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे इराणच्या राजवटीबद्दल अमेरिकेची भूमिका स्पष्ट आहे. इराणकडून येणाऱ्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी आमचे मित्र उभे आहेत आणि आवश्यकतेनुसार योग्य कारवाई करतील.”

इराणची प्रतिक्रिया काय?

इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्रालय आणि इतर अधिकाऱ्यांनी राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा त्यांचा हक्क सांगत इस्रायलविरुद्ध बदला घेण्याचा इराणचा हेतू असल्याचं स्पष्ट केलं आहे.

इस्रायलची प्रतिक्रिया नाही

हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हनियेची तेहरानमध्ये ३१ जुलै रोजी हत्या झाली. यानंतर ही हत्या इस्रायलने केल्याचा आरोप हमासकडून करण्यात येत आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया इस्रायलने दिलेली नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हौथी आणि हिजबुल्लाह यांच्या विरोधात इस्रायली लष्करी कारवाईचा उल्लेख केला. मात्र, हनियेहच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली नाही. तसेच त्याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamas chief ismail haniye killing iran orders direct attack on israel and us america responded marathi news gkt
Show comments