Hamas Chief Ismail Haniyeh Killed : गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इस्रायलमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत होतं. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली असून इराणच्या तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे.
तेहरानमधील इस्माईल हानियाच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आलं होतं. निवासस्थानाबाहेर झालेल्या स्फोटात हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानिया आणि एका रक्षकाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. इस्माईल हानियाच्या निवासस्थानावर झालेल्या स्फोटाला आणि इस्माईल हानियाच्या मृत्यूला हमासने इस्रायलला जबाबदार धरलं असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा : तालिबानकडून परदेशातील दूतावास बंद
याबाबत रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) सांगितले की, इस्माईल हानियाच्या तेहरानमधील निवासस्थानाला लक्ष्य करून स्फोट घडवून आणण्यात आला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. आता घटनेची चौकशी सुरु आहे, असं आयआरजीसीने स्पष्ट केलं. तसेच याबाबत आयआरजीसीने दुःख व्यक्त केलं. दरम्यान, हमासने हानियाच्या मृत्यूसाठी इस्रायलला जबाबदार धरलं आहे. तसेच पॅलेस्टाईन संघटना हमासनेही हानियाच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभाच्या कार्यक्रमात हनियाची उपस्थिती आणि त्यानंतर मंगळवारी इराणच्या काही नेत्यांशी झालेल्या भेटीनंतर ही घटना घडली असल्याची माहितीही सांगितली जात आहे.
इस्रायलची अद्याप प्रतिक्रिया नाही
हमासचा प्रमुख इस्माईल हानियाच्या हत्येला इस्रायल जबाबदार असल्याचं हमासने म्हटलं आहे. मात्र, याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
इस्माईल हानिया कोण आहे?
इस्माईल हानियाचा जन्म १९६२ मध्ये गाझा पट्टीत झाला. पॅलेस्टिनी नेता म्हणून इस्माईल हानियाला ओळखलं जात होतं. २०१७ मध्ये हमासचा प्रमुख राजकीय नेता म्हणून इस्माईल हानियाला ओळखलं जात होतं.