Hamas Leader Yahya Sinwar Killed Last Video Viral: गेल्या वर्षभरापासून इस्रायलमधील हमासचे हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं गाझा पट्टीत केलेल्या हवाई कारवाया याच्या चर्चा चालू आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे युद्ध चिंतेचा विषय ठरलं आहे. पण गुरुवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा म्होरक्या याह्या सिनवार ठार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या युद्धाला व हमासला मोठा झटका बसला आहे. आता हमासची पीछेहाट आणि पर्यायाने युद्ध संपुष्टात येण्याच्या दिशेने घडामोडी घडतील, असं मानलं जात आहे. पण त्याआधी इस्रायलच्या लष्करानं शेअर केलेला याह्या सिनवारच्या शेवटच्या क्षणांचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये याह्या सिनवार गंभीर जखमी अवस्थेत दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी इस्रायलकडून गाझा पट्टीत लष्करी कारवाई करण्यात आली. हमासच्या तळांवर हे हल्ले होत असल्याचा दावा इस्रायलकडून केला जातो. अशाच एका हवाई हल्ल्यात हमासचे तीन महत्त्वाचे सदस्य मारले गेल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे. त्यातच हमासचा म्होरक्या याह्या सिनवारही असल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘कसाई’ म्हटल्या जाणाऱ्या याह्या सिनवारचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा व्हिडीओ इस्रायलच्या लष्करानं शेअर केला असून त्यात याह्या सिनवार एका हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या घरात जखमी अवस्थेत बसल्याचं दिसत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ इस्रायल लष्कराच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करण्यात आला असून लष्कराच्या प्रवक्त्याने तो पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ एका ड्रोनने चित्रीत करण्यात आला आहे. एका उद्ध्वस्त झालेल्या इमारतीची वरून घेतलेली दृश्य व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहेत. नंतर हा ड्रोन कॅमेरा खाली उतरत इमारतीच्या एका छिन्नभिन्न झालेल्या घरात शिरतो. तिथे बॉम्बहल्ल्यामुळे घराचं झालेलं नुकसान सहज दिसून येत आहे. त्यातच धुळीच्या थरात एका सोफ्यावर हात तुटलेल्या अवस्थेत एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. हाच तो ‘कसाई’ याह्या सिनवार!

Yahya Sinwar : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार कोण होता? त्याला ‘कसाई’ का म्हटलं जायचं?

व्हिडीओत दिसणारी जखमी व्यक्ती याह्या सिनवार असल्याचं व्हिडीओमध्येच नावानिशी सांगण्यात आलं आहे. त्याचा उजवा हात तुटलेला असून तो सोफ्याच्या उजव्या बाजूच्या हँडरेस्टवर टेकलेला आहे. त्यातून रक्त सांडत आहे. त्याच्या डाव्या हातात एक लाकडी काठीसदृश्य वस्तू असून कॅमेरा जसा त्याच्या जवळ जातो, तसा याह्या कॅमेऱ्याच्या दिशेनं डाव्या हातातली वस्तू फेकत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एवढंच दिसत आहे.

कोण होता याह्या सिनवार?

आधीपासूनच कट्टर विचारांचा असणारा याह्या सिनवार १९८८ ते २०११ अशी २२ वर्षं तुरुंगात होता. सुटकेनंतर तो गाझा पट्टीत कारवाया करणाऱ्या हमास संघटनेत सामील झाला. २०१५ मध्ये सिनवारचा समावेश जागतिक पातळीवरील दहशतवाद्यांच्या यादीत करण्यात आला. २०१७ साली त्याच्याकडे हमासची सूत्रं सोपवण्यात आली. इस्रायलमध्ये क्रूरपणे पॅलेस्टाईन नागरिकांचं हत्याकांड करणऱ्या याह्या सिनवारला त्याच्या याच वृत्तीमुळे ‘कसाई’ म्हटलं जात होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamas chief yahya sinwar killed in israel air strike attack on gaza strip pmw