एपी, बैरूत
लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यात मंगळवारी हमासचे प्रमुख राजकीय नेते सालेह अरोरी यांच्या मृत्यूमुळे ‘हमास’ आणि इस्रायलमधील पश्चिम आशियातील संघर्ष चिघळण्याचा धोका वाढला आहे. इस्रायलविरुद्ध युद्ध सुरू झाल्यापासून सालेह अरोरी ‘हमास’चे सर्वात वरिष्ठ नेते होते.
सालेह अरोरी हमासच्या लष्करी शाखेचे संस्थापकही होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा बदला ‘हमास’ घेण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या ‘ड्रोन’ने हा हल्ला केल्याचे लेबनॉनच्या अधिकृत राष्ट्रीय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला.
हेही वाचा >>> आसाममध्ये बस-ट्रकच्या अपघातात १२ जणांचा मृत्यू; अपघातग्रस्तांना पंतप्रधानांकडून मदत जाहीर
अरोरी यांच्या मृत्यूनंतर लेबनॉनच्या शक्तिशाली बंडखोर संघटना ‘हिजबुल्लाह’ही मोठा बदला घेण्याची भीती आहे. ‘हिजबुल्लाह’चा गड असलेल्या बैरूतमधील शियाबहुल जिल्ह्यातील एका निवासी इमारतीवर हा हल्ला झाला. त्यानंतर ‘हिजबुल्लाह’चे नेते सय्यद हसन नसरल्लाह यांनी लेबनॉनमधील पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या इस्रायली हल्ल्यांचा पुरेपूर बदला घेण्याची शपथ घेतली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी गाझामध्ये इस्रायलच्या लष्करी कारवाईला सुरुवात झाल्यापासून हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यात इस्रायल-लेबनीज सीमेवर जवळजवळ दररोज चकमक उडत आहे. मात्र, ‘हिजबुल्लाह’ने आतापर्यंत मोठा हल्ला चढवलेला नाही. मात्र, ‘हिजबुल्लाह’ने या हल्ल्यानंतर मोठी कारवाई केल्यास इस्रायलच्या उत्तर सीमेवरील संघर्ष सर्वंकष युद्धात रुपांतरित होऊ शकतो.
पत्रकारांशी बोलताना इस्रायलचे लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगॅरी यांनी अरोरी यांच्या मृत्यूचा थेट उल्लेख केला नाही. परंतु ते म्हणाले, की आम्ही ‘हमास’विरुद्धच्या लढाईवर लक्ष केंद्रित केले आहे आणि यापुढेही लक्ष केंद्रित करणार आहोत.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या या भागातील दौऱ्यापूर्वी ही हत्या झाली आहे. अमेरिकेने ‘हिजबुल्लाह’ आणि त्याचा मित्र इराणला संघर्ष-हिंसाचार न वाढवण्याचा इशारा वारंवार दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी जोपर्यंत ‘हमास’चा समूळ नायनाट होत नाही आणि गाझामध्ये ‘हमास’ने ओलीस ठेवलेल्या १०० हून अधिक लोकांना सोडवले जात नाही तोपर्यंत गाझामधील आक्रमण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी म्हटले, की या युद्धास आणखी काही महिने लागू शकतात.
इस्रायलचा इशारा
इस्रायली अधिकाऱ्यांनी अलीकडेच काही दिवसांत ‘हिजबुल्लाह’कडून सीमेपलीकडून हा गोळीबार थांबेपर्यंत कारवाई तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. बिन्यामिन नेतान्याहू आणि अन्य इस्रायली अधिकाऱ्यांनी ‘हमास’च्या नेत्यांना वारंवार इशारा दिला आहे, की ते जिथे असतील तिथे त्यांना संपवले जाईल.