पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवादी संघटनेनं शनिवारी सकाळी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आहे. हमासकडून एकाच वेळी पाच हजार रॉकेट सोडल्याने इस्रायलमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या अनेक महिला बेपत्ता झाल्या आहेत. संबंधित महिलांचं हमास दहशतवादी संघटनेनं अपहरण केल्याची माहिती मिळत आहे.
यामुळे हमास दहशतवादी संघटनेकडून बलात्काराचा शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याची भीती ‘इस्रायल वॉर रुम’कडून व्यक्त करण्यात आली आहे. ‘इस्रायल वॉर रुम’ या स्वयंसेवी संस्थेनं आपल्या अधिकृत अकाऊंटवर हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या महिलांचा फोटो शेअर केला. यावेळी हमासकडून शस्त्र म्हणून बलात्काराचा वापर केला जात असल्याची भीती व्यक्त केली.
हेही वाचा- इस्रायलवर हल्ला करणारी पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे?
‘इस्रायल वॉर रुम’ ने अधिकृत ‘एक्स’ खात्यावर लिहिलं की, हमास या दहशतवादी संघटनेनं बहुतेक महिलांचं अपहरण केल्याचं दिसत आहे. हमासचे दहशतवादी बलात्काराचा वापर युद्धाचं शस्त्र म्हणून करत असल्याची पुष्टी यापूर्वीच झाली आहे. या रानटी लोकांवर दयामाया दाखवली जाऊ नये.”
खरं तर, शनिवारी (७ ऑक्टोबर) सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी एका महिलेच्या नग्न मृतदेहाची धिंड काढली. यावेळी काही लोक तिच्या मृतदेहावर थुंकताना व्हायरल व्हिडीओत दिसत आहेत. कौर्याची परिसीमा गाठणारा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक इस्रायलच्या अनेक महिला बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.