इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेदरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा आज १८ वा दिवस आहे. या युद्धात दोन्ही बाजूच्या हजारो लोकांनी जीव गमावला आहे. दरम्यान, सोमवारी (२३ ऑक्टोबर) पहाटे इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले केले. आम्ही गाझातील दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य करत आहोत, असं इस्रायलने म्हटलं आहे. तर इस्रायलने कोणतीही पूर्वसूचना न देता रहिवासी परिसरात हवाई हल्ले केले. त्यामध्ये १८२ मुलांसह ४३६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दुसऱ्या बाजूला हमासनेही इस्रायलवर क्षेपणास्रं डागल्याचं पाहायला मिळालं.
हमासने २२० हून अधिक सामान्य नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. या ओलिसांना सोडवण्यासाठी इस्रायली लष्कर प्रयत्न करत आहे. हमासने ओलिसांना सोडावं यासाठी इस्रायल, अमेरिका, युनायटेड किंगडमसह इतरही राष्ट्र प्रयत्न करत आहेत. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी सोमवारी संध्याकाळी दोन वृद्ध इस्रायली महिलांना मुक्त केलं आहे. या दोन्ही महिलांची प्रकृती खालावल्यामुळे हमासने त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. या सुटकेसाठी इस्रायलने इजिप्त आणि रेड क्रॉस संस्थेचे आभार मानले आहेत.
नुरिट कूपर (७९) आणि योचेवेद लिफशिट्ज (८५) अशी या दोन्ही महिलांची नावं आहेत. या दोन्ही महिलांचे पती अद्याप हमासच्या ताब्यात आहेत. अमीरम कूपर (८४) ओडेड लाइफशिट्ज (८३) अशी त्यांच्या पतींची नावं आहेत. या महिलांना इजिप्तमध्ये सोडण्यात आलं असून तिथून त्यांना इस्रायलमधील एका रुग्णालयात पाठवलं जाणार आहे. तत्पूर्वी हमासने गाझात ओलीस ठेवलेल्या अमेरिकन महिलेची आणि तिच्या मुलीची सुटका केली होती. ज्युडिथ आणि नताली रानान अशी या दोन महिलांची नावं आहेत. या दोन महिलांना इजिप्तसह राफा क्रॉसिंगद्वारे मुक्त करण्यात आलं होतं.
हे ही वाचा >> गाझामध्ये शिरण्यासाठी इस्रायली लष्कर सज्ज; १७व्या दिवशीही हवाई हल्ले सुरू, गाझा पट्टीत आणखी मदत सामग्री
हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर शेपणास्रं डागून युद्धाला सुरुवात केली होती. क्षेपणास्रं हल्ल्यामुळे इस्रायलच्या सीमा भागात अनागोंदी माजली. या अनागोंदीचा फायदा घेत हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले आणि त्यांनी इस्रायली नागरिकांची कत्तल सुरू केली. शेकडो नागरिकांच्या कत्तलीनंतर त्यांनी इस्रायली महिलांचं अपहरण केलं. त्यामुळे इस्रायलनेही गाझा पट्टीत आणि पॅलेस्टाईनवर क्षेपणास्रं डागली. तेव्हापासून हे युद्ध सुरू आहे. २२० हून अधिक नागरिक हमासच्या ताब्यात आहेत. हमासने त्यांना ओलीस ठेवलं आहे. या ओलिसांना सोडवण्यासाठी इस्रायलसह रेड क्रॉस संस्थादेखील प्रयत्न करत आहे.