ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेले इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध अद्यापही संपलेलं नाही. परंतु, आता हमासने युद्धविराम योजना प्रस्तावित केल्याचे वृत्त आहे. यामुळे गाझामधील तोफा साडेचार महिन्यांत शांत होतील. परिणामी इस्रायलविरोधातील युद्ध संपेल. रॉयटर्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रॉयटर्सच्या सूत्रांनुसार, हमासने युद्धविरामासाठी प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात प्रत्येकी ४५ दिवसांचे तीन टप्पे आहेत. प्रस्तावानुसार, दोन्हीकडील ओलिसांची देवाणघेवाण केली जाईल. गाझाचा पुनर्विकास केला जाईल, इस्रायली सैन्य पूर्णपणे माघार घेतील आणि मृतदेहही ताब्यात दिले जाणार आहेत.
कसे असतील तीन टप्पे?
हमासच्या प्रस्तावानुसार, इस्रायली तुरुंगातून पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची सुटका करण्याच्या बदल्यात, सर्व इस्रायली महिला ओलिस, १९ वर्षाखालील पुरुष, वृद्ध आणि आजारी यांना पहिल्या ४५ दिवसांच्या टप्प्यात सोडले जाईल. उर्वरित पुरुष ओलिसांना दुसऱ्या टप्प्यात सोडण्यात येईल आणि तिसऱ्या टप्प्यात त्यांची देवाणघेवाण केली जाईल. तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी, दोन्ही बाजूने युद्ध संपलेले असेल अशी हमासला अपेक्षा आहे.
१५०० हजार कैद्यांची सुटका
इस्रायलने काही पॅलेस्टिनी नागरिकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी एक तृतीयांश नागरिक म्हणजेच जवळपास १५०० कैद्यांची सुटका करण्याची मागणी गाझाने त्यांच्या प्रस्तावातील परिशिष्टात केली आहे. उपासमारीचा समाना आणि मूलभूत गजांची तीव्र टंचाई निर्माण झालेल्या गाझामधील हताश नागरिकांना मदतीचा प्रवाह यामुळे वाढण्याची शक्यता आहे.
७ ऑक्टोबर रोजी हमास-शासित गाझामधील अतिरेक्यांनी १२०० लोक मारले आणि दक्षिण इस्रायलमध्ये २५३ ओलिस घेतल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये आपले लष्करी आक्रमण सुरू केले. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की इस्रायलच्या लष्करी मोहिमेत किमान २७ हजार ५८५ पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. तर, हजारो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याचीही भीती व्यक्त केली आहे.